गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

By admin | Published: June 23, 2015 12:55 AM2015-06-23T00:55:20+5:302015-06-23T00:55:20+5:30

दत्तात्रय शिंदे : रात्रीच्यावेळी गस्तीपथक वाढविणार

Preventive measures to prevent crime | गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

Next

सिंधुदुर्गनगरी : सध्या जिल्ह्यात होत असलेल्या चोऱ्या हा अतिशय संवेदनशील विषय आहे. या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी व गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी तीन प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांमध्ये संवेदनशील व गुन्हे प्रवण क्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे. रात्रीच्यावेळी गस्तीपथक वाढविणे व प्रथम, द्वितीय प्रभारी पोलीस अधिकारी गस्ती घालून या सर्वांचा आढावा घेणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी ते म्हणाले की, वाढत्या चोऱ्यांचा विषय हा चिंतेचा विषय आहे. साधारणत: जून महिन्यात पावसाचा फायदा घेऊन चोऱ्यांचे प्रकार होत आहेत. यापूर्वीच्या काही वर्षातील चोऱ्यांच्या गुन्ह्याचा आढावा घेतला तर जून महिन्यातच जास्त चोऱ्या झाल्याचे उघड झाले आहे. या चोऱ्या रोखण्यासाठी तीन नवीन उपाययोजना आखल्या आहेत. यामध्ये फिक्स पॉईड, गस्ती वाढविणे व या दोघांवर प्रथम व द्वितीय दर्जाचे पोलीस अधिकारी लक्ष ठेवून ते स्वत: गस्त घालणार आहेत.
दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना बसणार चपराक
जिल्ह्यात पाऊस सक्रीय झाल्याने वर्षा पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्यांसाठी गोवा, कर्नाटक राज्याप्रमाणेच इतर ठिकाणांहून आंबोली येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. पर्यटनवाढीच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्या ठिकाणी जर काही अतिउत्साही पर्यटक दारु पिऊन धिंगाणा घालत असतील तर ते गैर आहे. त्यामुळे अशा पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात सुरक्षित पर्यटन व्हावे यासाठी पर्यटक सुरक्षा व नियमन पथकांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. तसेच आंबोली येथील वर्षा पर्यटन स्थळावर शनिवार व रविवार विशेष वाढीव पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात कोठेही गावठी दारु काढणारे, बाळगणारे व विकणारे लोक मिळून आल्यास त्यांच्याविरूद्ध तत्काळ कारवाई करा असेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात आपत्कालीनसाठी १०० नंबर, महिला सुरक्षा संबंधित व लहान मुलांच्या संबंधित सुरक्षा संबंधित १०९१ व सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने १०९३ असे टोल फ्री नंबर असून या संबंधी काही घडना घडल्यास या नंबरशी संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता असे आवाहनही यावेळी दत्तात्रय शिंदे यांनी नागरिकांना केले आहे. (प्रतिनिधी)


आपत्तीच्या ठिकाणी तातडीने पोहोचा
जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास तसेच दरडी कोसळल्यास सर्वसामान्यांना मदतीच्या दृष्टीने प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांने सतर्क रहा. आपत्ती निर्माण झाली तर तत्काळ घटनास्थळी पोहोचा. महामार्गावर झाड उन्मळून पडले तर ते तोडून बाजूला करण्यासाठी गाडीमध्ये कायमस्वरूपी कुऱ्हाड व करवत ठेवा असे आदेशही सर्व पोलिसांना दिल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

Web Title: Preventive measures to prevent crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.