गणेश मूर्तींच्या किंमती महागणार

By admin | Published: August 20, 2015 10:43 PM2015-08-20T22:43:32+5:302015-08-20T22:43:32+5:30

चित्रशाळांमध्ये लगबग : महागाईमुळे सांगड घालताना मूर्तिकारांना नाकीनऊ

Prices of Ganesh idols will rise | गणेश मूर्तींच्या किंमती महागणार

गणेश मूर्तींच्या किंमती महागणार

Next

प्रथमेश गुरव - वेंगुर्ले  गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपल्याने गणेश चित्रशाळेत मूर्ती कामांना वेग आला आहे. गणेश चित्र शाळांमध्ये मूर्तिकार रात्री जागून मूर्तीना आकार देण्यात मग्न आहेत. यावर्षी १५ ते २0 टक्क्याने गणेश मूर्तींच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता मूर्तिकार वर्तवित आहेत. तर वेंगुर्ले नगरपरिषदने प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मूर्तीचा वापर टाळावा, असे आवाहन केल्याने मूर्तिकार संंभ्रमात आहेत.
कोकणातील महत्वाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी. या उत्सवासाठी चाकरमानी कितीही कामात व्यस्त असले तरी वेळातवेळ काढून गावाला येतात. हा गणेश उत्सव अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्याने मूर्ती शाळांमध्ये गणेश मूर्त्यांना आकार देण्यात मूर्तिकार मग्न झाले आहेत. सगळीकडेच महागाईचे संकट असताना गणेश मूर्ती तरी त्यातून कशा सुटतील? मूर्तीसाठी लागणारी माती व रंग यांच्या किंमतीत वाढ झाल्याने यावर्षी २0 टक्क्याने गणेश मूर्तींच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे. एकेकाळी मूर्तिकार मूर्तींच्या किंमती सांगत नसत, येणारा भक्त जी काही समजून गणेश मूर्तीची किंमत देईल त्यात समाधान मानत होते.
परंतु आता गणेश मूर्तींसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च, कारागीरांचे वेतन व गणेश मूर्तींमधून येणारे उत्पन्न यांची सांगड घालताना गणेश मूर्तिकारांना नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय दिवसेंदिवस खर्चिक होत चालल्याने मूर्तींची किंमती वाढविण्यावाचून पर्याय नसल्याचे मूर्तिकार सांगतात. तर काही मूर्तिकारांनी १ हजार रुपये फुट अशाप्रकारे मूर्तींचे दर लावल्याने जेवढी मोठी मूर्ती तेवढे जादा पैसे गणेश भक्तांना मोजावे लागणार आहेत.
काही मूर्तिकार आता मूर्तीलाच किंमतीचे लेबल लावून ठेवतात. सिंधुदुर्ग व गोव्यात गणपतीच्या मोठ्या मूर्ती बसविण्याकडे कल असतो. रत्नागिरी व उर्वरीत कोकणात गणेश मुर्तींचा आकार प्राधान्याने लहानच असतो.
परंतु आता एकंदर वाढलेल्या खर्चाचा विचार करता येथील गणेश भक्तही छोट्याच मूर्ती घेणे पसंत करत आहेत.
हौसेला जरी मोल नसले तरी देव हा भक्तीचा भुकेला आहे. मूर्तीचा आकार भक्तांच्या ऐपतीप्रमाणे छोटा किंवा मोठा झाला तरी या उत्सवाच्या आनंदात मात्र तसूभरही कमतरता येणार नाही हे मात्र निश्चित.


प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती विकू नका
सध्या बाजारपेठेत प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या शहरांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. मातीच्या मूर्तीपेक्षा प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती सुबक व वजनाने हलक्या असल्या तरी विजर्सन केल्या तरी त्या मातींच्या मूर्तीप्रमाणे पाण्यात विरघळत नसल्यामुळे प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्त्यांची होणारी विटंबना तसेच होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी वेंगुर्ले नगरपरिषदेने प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती न विकण्याचे आवाहन मूर्तिकारांना केले आहे.
एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले असून विभक्त कुटुंब पद्धतीमुळे गणेश मूर्त्यांची संख्या वाढत आहे. गणेश मूर्त्यांची वाढती मागणी लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेल्या मूर्तिकारांना कारागीरांची कमतरता पडत असून ही वाढती मागणी पूर्ण करणे शक्य होत नाही. त्यासाठी मूर्तिकारांची संख्या वाढणे गरजेचे असल्याचे येथील स्थानिक मूर्तिकार सांगत आहेत.

गणेश मूर्तीची मागणी वाढत असून त्यामानाने मूर्तिकारांच्या संख्येत वाढ होत नाही आहे. मूर्तिकारांची संख्या वाढणे गरजेचे असून त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात मूर्तीकला हा विषय शासनाने समाविष्ट करावा. त्यामुळे ही कला पिढीजात न रहाता तरुण वर्गही कलेकडे आकर्षित होऊन मागणी पूर्ण होण्यास हातभार लागेल. मूर्तिकारांना शासनाकडूनही इतर कलाकारांप्रमाणेच पेन्शन योजना लागू केल्यास त्यांच्या वृद्धापकाळातील उपजिविकेचा प्रश्न सुटेल.
- चेतन नार्वेकर, मूर्तिकार, वेंगुर्ले

Web Title: Prices of Ganesh idols will rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.