मुख्यमंत्र्यांकडून बंधाऱ्यांचे कौतुक
By admin | Published: January 19, 2016 11:00 PM2016-01-19T23:00:17+5:302016-01-19T23:41:40+5:30
लोकसहभाग : कृषी विकास अधिकाऱ्यांच्या पाठीवर थाप
रहिम दलाल --रत्नागिरी लोकसहभाग व श्रमदानातून जिल्ह्यात मिशन बंधारे मोहीम राबवण्यात आली. या यशस्वी योजनेची दखल जिल्हा दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. श्रमदानातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे २४१ कोटी लीटर्स पाणी साठा करण्यात आला.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १००० मिलिमीटर पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यात उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाई उद्भवणार असल्याचे चित्र समोर ठेवण्यात आले होते. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याच्या दृष्टिने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे २०१५-२०१६ हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे जिल्हा परिषद कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर कृषी अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन तालुकास्तरावर अधिकारी, कर्मचारी, सरपंच यांना बंधारे बांधण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे आदींमध्ये वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम सुरु करण्यात आले. जिल्ह्यात गावोगावी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पे्ररणा देशभ्रातर, उपाध्यक्ष सतीश शेवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू होते.
साडेतीन महिन्यांच्या कालावधीत ४५७७ वनराई, विजय व कच्चे बंधारे बांधण्यात आले. त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीप्रमाणे आहे.
हे बंधारे बांधण्यासाठी खासगी कंपन्या, ठेकेदार, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींकडून आवश्यक असलेल्या साहित्याचा वापर करण्यात आला. बंधाऱ्यांमुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे वन्य प्राणी, पाळीव जनावरे, शेळ्या-मेंढ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले असताना चिपळूण येथील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी मिशन बंधारे २०१५-१६ च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामाची दखल घेतली व बंधारे उभारण्याच्या कामाची प्रशंसा केली. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील हजारो लोक उपस्थित होते.