मालवण पंचायत समितीने बनविले प्रायमरी एज्युकेशन विद्यालय अॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 04:52 PM2020-06-20T16:52:34+5:302020-06-20T16:54:19+5:30
कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांकडे बराच वेळ उपलब्ध आहे. विद्यालय अॅपच्या माध्यमातून त्यांना वेळेचा सदुपयोग करता येणार आहे. मालवण पंचायत समितीने बनविलेले हे अॅप जास्तीत जास्त पालक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी केले.
मालवण : कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांकडे बराच वेळ उपलब्ध आहे. विद्यालय अॅपच्या माध्यमातून त्यांना वेळेचा सदुपयोग करता येणार आहे. मालवण पंचायत समितीने बनविलेले हे अॅप जास्तीत जास्त पालक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी येथील पंचायत समितीने बनविलेल्या प्रायमरी एज्युकेशन विद्यालय अॅपचे उद्घाटन शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, शिक्षण सभापती सावी लोके, महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, जिल्हा परिषद सदस्य सरोज परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर, पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगावकर, अशोक बागवे, मनीषा वराडकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, विस्तार अधिकारी उदय दीक्षित, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण तसेच तालुक्यातील केंद्रप्रमुख उपस्थित होते.
पराडकर म्हणाले, येथील पंचायत समितीने नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. कोरोना कालावधीत विद्यालय अॅपचा उपक्रम विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. पाताडे म्हणाले, तालुक्यात ६० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांपर्यत हे अॅप पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. शिवाय ग्रामपंचायतींना बीबीएनएल वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या अॅपचा वापर करता येणार आहे.
परूळेकर म्हणाले, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अॅप निर्मितीची संकल्पना आम्ही मांडली. ही संकल्पना पंचायत समितीचे कर्मचारी, विषयतज्ज्ञांनी सत्यात साकारली. सूत्रसंचालन श्याम चव्हाण यांनी केले तर कैलास राऊत यांनी आभार मानले.
अभ्यासक्रमांच्या पाठातील पीडीएफ फाईल बनविल्या
हे अॅप बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अमर वाघमारे, गुरूनाथ ताम्हणकर, विनीत देशपांडे, दिनकर शिरवलकर, परशुराम गुरव, भागवत आवचार, नंदकिशोर हळदणकर या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
विजय देशपांडे यांनी विद्यालय अॅपची माहिती उपस्थितांना दिली. या अॅपमध्ये इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतचा अभ्यासक्रम समाविष्ट आहे. अभ्यासक्रमातील पाठांच्या पीडीएफ बनविल्या आहेत. पाठांची यु ट्युब लिंकही देण्यात आली आहे. नेटची सुविधा असल्यास लिंकवरून विद्यार्थ्यांना धडे अभ्यासता येणार आहेत.
प्रत्येक पाठाखाली स्वाध्याय देण्यात आले आहेत. क्युआर कोडवरून देखील विद्यार्थ्यांना पाठाचा अभ्यास करता येणार आहे. प्रारंभी इंटरनेटद्वारे अॅपमधील पाठाचा भाग डाऊनलोड करून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर आॅफलाईन पद्धतीने विद्यार्थी या पाठांचा अभ्यास करू शकतील.