नौदल भरतीत प्राधान्य द्या
By Admin | Published: July 18, 2016 09:02 PM2016-07-18T21:02:01+5:302016-07-19T00:26:53+5:30
मच्छिमारांची मागणी : अधिकाऱ्यांच्या असहकार्याविषयी नाराजी
वेंगुर्ले : नवीन नौकांना व्हीआरसी, बायोमेट्रिक कार्ड, मासेमारी परवाने द्यावे व नौदल विभागातील नोकर भरतीमध्ये मच्छिमार समाजातील तरुणांना प्राधान्य द्यावे, आदी मागण्या सागरी सुरक्षा रक्षक, मच्छिमार संस्था, प्रतिनिधी, क्रियाशील मच्छिमार व नौकाधारकांच्या बैठकीत करण्यात आली.ही बैठक भारतीय तटरक्षक व्यवस्थापन समिती रत्नागिरीचे कोस्ट गार्ड अधिकारी दिनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ले पोलिस ठाण्यात झाली. यावेळी विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीत दिनेश कुमार यांनी अनोळखी जहाज दिसल्यास, नौकेवरील यंत्रणेचा वापर, जीवरक्षक साधनांचा वापर, आवश्यक संपर्क यंत्रणा, संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळून आल्यास आवश्यक खबरदारी घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मासेमारी सुरू झाल्यानंतर परप्रांतीय पर्ससीन ट्रॉलर्स येथे येऊन धुमाकूळ घालतात. बऱ्याचवेळा त्यांच्याकडे परवानेही नसतात. अशा नौकांवर कारवाई करण्यास मत्स्य व्यवसाय विभागाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने त्यांना रोखता का येत नाही. याबाबत विचार व्हावा. नवीन नौकांना वर्ष-दोन वर्षे व्हीआरसी मिळत नाही. अत्यावश्यक असलेले बायोमेट्रिक कार्डही मिळत नाही, मासेमारी परवाने वेळेवर मिळत नाहीत, यासंदर्भात एकत्रित चर्चा करण्यासाठी पोलिस विभाग, मत्स्यविभाग व मच्छिमार यांची बैठक २५ जुलैपूर्वी घेण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी ही बैठक लवकरात लवकर घेऊन योग्य तो मार्ग काढू, असे पोलिस निरीक्षक आबाळे यांनी सांगितले. या बैठकीला मच्छिमार नेते वसंत तांडेल, मच्छिमार बाबी रेडकर, सुहास तोरसकर, मोहन सागवेकर, अनंत केळुसकर, संतोष तांडेल, गजानन कुबल, आदी ८० मच्छिमार उपस्थित होते. (वार्ताहर)
आवाजाचे गूढ कायमच....
एप्रिल महिन्यात ८, १६ व १४ या तारखांना वेंगुर्ले किनारपट्टीवर तीन वेळा स्फोट सदृश आवाज आले होते.
तटरक्षक प्रवीण सैदाणे, उत्तम नाविक, मनोज थापा यांच्याशी संपर्क साधल्यानंतरही योग्य सहकार्य मिळत नाही.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पाहणी केली तरी अद्यापपर्यंत निदान झाले नाही. मच्छिमारांच्या या प्रश्नाला यावेळीही बगल देण्यात आली.