संगणकीकरणाला प्राधान्य : बापट

By admin | Published: June 26, 2015 11:17 PM2015-06-26T23:17:36+5:302015-06-27T00:19:27+5:30

महत्त्वाचे बदल : वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणणार, रत्नागिरीतील बैठक

Priority of computerization: Bapat | संगणकीकरणाला प्राधान्य : बापट

संगणकीकरणाला प्राधान्य : बापट

Next

रत्नागिरी : रास्तदर धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी संगणकीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यात रेशनकार्ड आधारकार्डशी जोडण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच धान्य वाहतुकीत जीपीएस पद्धतीचा वापर आणि रेशन दुकानांवर बायोमेट्रिक प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केले.रत्नागिरी दौऱ्यावर आले असता आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., कोकण विभागीय पुरवठा विभागाचे उपायुक्त किशन जावळे, माजी आमदार बाळ माने, माजी आमदार विनय नातू, जिल्हा पुरवठा अधिकारी नीता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
संगणकीकरणामुळे रास्तदर धान्य वितरण प्रक्रियेत होणाऱ्या काळ्या बाजाराला आळा बसण्याबरोबरच बोगस रेशनकाडर््सचा प्रश्न निकाली निघू शकेल. यामुळे शासनाकडून देण्यात येणारे धान्य आणि पैशांची बचत होऊ शकेल. तसेच नागरिकांनाही योग्य प्रमाणात धान्य मिळणार असल्याचे बापट यांनी सांगितले. धान्य वितरण प्रक्रियेत होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. प्रत्येक जिल्ह्यात धान्याच्या गरजेपेक्षा तिप्पट प्रमाणात धान्य साठवणूक करण्याची व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून बापट यांनी रत्नागिरीत सद्यस्थितीतील धान्य गोदामांबरोबरच ब्रिटिशकाळात बांधण्यात आलेली आणि सध्या विनावापर पडून असणारी गोदामे वापरात आणावीत, असे सांगितले. अशा गोदामांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करुन घ्यावा. त्याचप्रमाणे केरोसिन वितरणात होणाऱ्या काळ्या बाजाराला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना पुरवठा विभागाला दिली. जिल्ह्यातील मच्छिमार बांधव आणि आंबा बागायदार यांना केरोसिन उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बापट यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा घेतला. यात विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाया, रिक्त पदे व इतर अडचणी जाणून घेतल्या. जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयात जागा उपलब्ध करुन घेऊन त्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने जेनेरिक औषधे उपलब्ध करुन देण्यात यावीत. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन द्यावा. जिल्ह्यातील तालुकास्तरावरही प्रायोगिकतत्त्वावर अशा रितीने जेनेरिक औषधे नागरिकांना मिळण्यासाठी व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी दिली.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पुरवठा विभागाच्या कामाचा आढावा घेतला. जेनेरिक औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, प्रायोगिक तत्त्वावर औषधे उपलब्ध करुन देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, अन्न व औषध प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)


परखड मार्गदर्शन
अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
जेनेरिक औषधे नागरिकांना मिळण्याची दिली सूचना
पुरवठा विभागाच्या कामांचा घेतला आढावा
गोदामाच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार
रिक्त पदांबाबत चर्चा


बापट यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत अन्न व औषध प्रशासनासंबंधातील माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतली. गोदाम दुरूस्ती, जेनेरिक औषधांची व्यवस्था, रिक्त पदे आदीबाबत आढावा गेऊन प्रणालीबाबत मार्गदर्शन केले. गोदामांच्या दुरूस्तीवरही त्यांनी निधीचे आश्वासन दिले.

Web Title: Priority of computerization: Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.