‘तेरेखोल’मधील बंधाऱ्याने अडचण
By admin | Published: June 5, 2015 12:25 AM2015-06-05T00:25:39+5:302015-06-05T00:30:15+5:30
शेतकरी हवालदिल : पावसाळ्यात पुराचे पाणी घुसणार
ओटवणे : तेरेखोल नदीपात्रात इन्सुली बिलेवाडी दरम्यान उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे स्थानिक विलवडे गावातील शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
इन्सुली-वाफोली-चराठे-माजगाव, आदी गावांच्या नळयोजना उन्हाळ्यात सुस्थितीत कार्यरत रहाव्यात यासाठी तेरेखोल नदीपात्रात इन्सुली-बिलेवाडी दरम्यान काही वर्षापूर्वी बंधारा उभारण्यात आला होता. या बंधाऱ्यामुळे त्या ठिकाणी पाणी अडविले जाते आणि नळयोजनेमार्फत सुरळीत पाणीपुरवठा केला जातो.
मात्र, या उभारलेल्या बंधाऱ्यामुळे त्यामागील विलवडे शेतकऱ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात वरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा लोंढा या बंधाऱ्यामुळे अडविला जातो. आणि हे पाणी जवळच असलेल्या स्थानिक विलवडे शेतकऱ्यांच्या बागांमध्ये पुराप्रमाणे घुसत आहे. यामुळे नदीकिनारचे मातीचे बंधारे तर उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच केळी, माड, पोफळीच्या बागा तसेच भाजीपाल्याची पिकेसुद्धा दरवर्षी पावसामध्ये मातीत मिळून वाहून जातात. केळी, माड, पोफळी अक्षरश: कोलमडून पडून मोठी नुकसानीही गतवर्षी शेतकऱ्यांची झालेली आहे. (वार्ताहर)