सी-वर्ल्डच्या जागेची प्रक्रिया सुरू
By admin | Published: June 26, 2016 12:32 AM2016-06-26T00:32:32+5:302016-06-26T00:32:32+5:30
आराखड्यानुसार मोजणी : वायंगणी-तोंडवळी येथील चिन्हांकित काम चार दिवसांत पूर्ण
मालवण : मालवण तालुक्यातील वायंगणी तोंडवळी प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्पाच्या बनविण्यात आलेल्या आराखड्यानुसार जागा मोजणी आणि चिन्हांकित करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या हुबळी येथील व्हिजन सोल्युशन या संस्थेने शनिवारपासून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला असून, चार ते पाच दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती टीमप्रमुख वीरुपाक्ष मारडगी यांनी दिली आहे.
दरम्यान, नव्या आराखड्यानुसार वायंगणी-तोंडवळी माळरानावर साकारल्याजाणाऱ्या सी-वर्ल्ड प्रकल्पाचा केंद्रबिंदू ३४१ एकर जागेत असणार आहे, तर कालावल खाडीकि नारी १८ एकर व वायंगणी तोंडवळी समुद्रकिनाऱ्यावर ३१ एकर अशी ३९० एकर जागेसह एकूण ४२२ एकर जागा सी-वर्ल्ड प्रकल्पासाठी आराखड्यानुसार मोजणी करून चिन्हांकित केली जाणार आहे.
राज्य शासनाकडून गतिमान हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे येथील ‘सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क’ या संस्थेने बनविलेला ३४१ एकरचा आराखडा बनविला आहे. वायंगणी तोंडवळी प्रस्तावित ३४१ एकर जागेची पाहणी करण्यासाठी शासनाकडून चार सदस्यीय तज्ज्ञ टीम मालवणात दाखल झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने चिन्हांकित जागेवर ‘नीस’ दगड निश्चित केले जाणार आहेत.
भाजपकडून पाहणी
प्रकल्पाच्या चिन्हांकित करण्याच्या प्रक्रियेची भाजप मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पाहणी करीत माहिती घेतली. यावेळी भाजपकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. मोंडकर यांच्यासमवेत शहर अध्यक्ष बबलू राऊत, तालुका सरचिटणीस तथा हडी सरपंच महेश मांजरेकर, आदी उपस्थित होते. तज्ज्ञ टीमकडून आराखडा, प्रत्यक्ष मोजणी प्रक्रिया याबाबत माहिती जाणून घेण्यात आली.