भेकुर्लीतील जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु
By admin | Published: June 8, 2014 01:06 AM2014-06-08T01:06:41+5:302014-06-08T01:13:25+5:30
भेकुर्ली येथील चाळीस भूमिहीन कुटुंबांना घर बांधण्यासाठी व शेतीसाठी शासनाकडून जमीन मिळणार आहे. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी स्वत: भेकुर्लीला भेट
कसई दोडामार्ग : भेकुर्ली येथील चाळीस भूमिहीन कुटुंबांना घर बांधण्यासाठी व शेतीसाठी शासनाकडून जमीन मिळणार आहे. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी स्वत: भेकुर्लीला भेट देऊन जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे लाभार्थ्यांना सांगितले. घरांसाठी लाभार्थ्यांना तीन गुंठ्यांचे भूखंड, शाळा व अन्य नागरी सुविधांसाठी गावठाण निर्माण करण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाला दोन एकर शेतजमीन देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठविला जाणार आहे. भूमिहिनांना घरांसाठी हक्काची जमीन मिळणार आहे. भेकुर्लीत शासकीय जमीन आहे. निडली व भेकुर्लीतील धनगर, दलित व इतर मागासवर्गीय ४० भूमिहीन कुटुंबांना शेती व घरांसाठी ही जागा मिळावी, यासाठी सरपंच प्रेमानंद देसाई यांनी प्रयत्न सुरू केले. जागा मिळविण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच या प्रस्तावासंबंधी सकारात्मकता दर्शविली. स्वत: लक्ष घालून तहसीलदारांना जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. शुक्रवारी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी भेकुर्लीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार बी.बी. जाधव, एकनाथ नाडकर्णी, जनार्दन गोरे, प्रभारी गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, भूमिअभिलेखचे अधीक्षक महेश गावकर, तालुका कृषी अधिकारी कांबळे, चौकुळ कुंभवडेचे सरपंच विजय गावडे, पोलीस उपनिरीक्षक पोवार व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी भेकुर्ली मंदिरात झालेल्या चर्चेदरम्यान तहसीलदार व भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी जमिनीची माहिती दिली. तसेच चाळीस कुटुंबांना देण्यात येणाऱ्या जमिनीचा आराखडा सादर केला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी, लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी दहा एकर क्षेत्र गावठाण म्हणून विकसित करणे शक्य आहे. जिल्हास्तरावरून त्याला मान्यता मिळू शकते. प्रत्येक कुटुंबाला तीन गुंठ्यांचे भूखंड देण्यात येतील. त्यासाठी सुमारे पाच हजार रुपये रक्कम शासनाकडे जमा करावी लागेल, असे सांगितले.
तळकट रस्त्यासाठी निधी देणार
जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी व कुंभवडे सरपंच विजय गावडे यांनी कुंभवडे व तळकट रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ई. रवींद्रन यांनी रस्त्याच्या मोरी व गटारासाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)