महाराष्ट्रात नारळाची उत्पादनक्षमता कमी

By admin | Published: September 3, 2016 11:00 PM2016-09-03T23:00:01+5:302016-09-04T00:37:00+5:30

तपस भट्टाचार्य : नारळ बागायतदार, उद्योजकांचा मेळावा

The productivity of coconut in Maharashtra is low | महाराष्ट्रात नारळाची उत्पादनक्षमता कमी

महाराष्ट्रात नारळाची उत्पादनक्षमता कमी

Next

रत्नागिरी : अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नारळाचे उत्पादन क्षेत्र जास्त आहे. मात्र, आपल्याकडे उत्पादन क्षमता कमी असून, याचा गांभीर्याने विचार नारळ उत्पादकांनी करणे आवश्यक आहे. नारळ पिकाबाबत विद्यापीठातर्फे संशोधन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी केले.
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये व श्रीफळ उत्पादक हितवर्धक संघ, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक नारळ दिनानिमित्त नारळ बागायदार व उद्योजकांचा मेळावा अल्पबचत सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. भट्टाचार्य बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, केरळचे तज्ज्ञ महेश्वरम् अप्पा, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, नारळ बोर्डाचे उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये, नारळ बागायतदार संघाचे अध्यक्ष अनिल जोशी, अभिजीत हेगशेट्ये, नाझीम पडवेकर उपस्थित होते.
डॉ. भट्टाचार्य यांनी नारळाचे उत्पादन क्षेत्र मोठे असतानाही यातून मिळणाऱ्या कमी उत्पन्नाचे कारण शोधणे महत्वाचे असल्याचे यावेळी सांगितले. केरळ येथील तज्ज्ञ महेश्वर अप्पा यांनी महाराष्ट्र आणि केरळ राज्यांमधील नारळ उत्पादनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी सांगितले की, नारळाला केवळ पावसाचे पाणी पुरेसे असल्याचा गैरसमज येथील बागायदारांमध्ये आहे. मात्र, नारळाला दररोज पाण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप यांनी सांगितले की, नारळ पिकाच्या वाढीव उत्पादनासाठी येथील बागायदारांना मार्गदर्शनाची गरज असून, या मार्गदर्शनामुळे यातील काही तांत्रिक बाबी येथील बागायदारांना कळतील, असा विश्वास व्यक्त केला. बारीक-बारीक गोष्टी समजून घेऊन नारळ पीक व उत्पादनाच्या विकासाकडे वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The productivity of coconut in Maharashtra is low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.