प्राध्यापकप्रश्नी मनसे आक्रमक
By Admin | Published: August 11, 2015 11:22 PM2015-08-11T23:22:58+5:302015-08-11T23:22:58+5:30
मालवण शासकीय तंत्रनिकेतनमधील वाद : पंधरा दिवसात पदे भरा; अन्यथा आंदोलन
मालवण : मालवण-कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे विविध विभागासाठी प्राध्यापक नाहीत. शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु झाला असला तरी महाविद्यालयात सुमारे ४५ प्राध्यापकांची रिक्त पदे आहेत. प्राध्यापक उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत मंगळवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत प्रभारी प्राचार्यांना जाब विचारला. येत्या १५ दिवसात प्राध्यापक नियुक्त न केल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मनसे मालवण तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी दिला. मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे प्राध्यापकांची ४५ पदे रिक्त असल्याने मुलांचे नुकसान होत आहे. गणेश वाईरकर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. प्राध्यापकांची कमतरता असल्याने काही प्राध्यापक एकाच विभागात दोन-दोन तासिका घेतात, तर काही विभागात तासिका होतच नाहीत. प्राध्यापक पदाची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी.
विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड प्रशासनाने मिटवावी अशी भूमिका मनसे पदाधिकार्यांनी घेतली. नियुक्ती प्रक्रिया ही प्राचार्यांच्या हाती नसते. राज्य शासनच्या तंत्रशिक्षण विभागाकडे सर्व अधिकार आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालय प्रशासन काळजी घेत आहे. प्राध्यापक कमी असल्याने इतर प्राध्यापक वर्गावर ताण पडत आहेत. असे असले तरी तासिका चुकू नयेत यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते, असे प्रभारी प्राचार्य सु. भा. शिरभाते यांनी स्पष्ट केले.
यावेळी भिवा शिरोडकर, विल्सन गिरकर, विनोद सांडव, दत्ता रेवंडकर, माणगावकर आदी पदाधिकारी व मनसेचे कार्यकर्ते उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
तासिकांचे नियोजन कसे करता ? : वाईरकर
महाविद्यालयात प्राध्यापकांची ५९ पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ १४ पदे भरण्यात आली आहे. सुमारे ४५ प्राध्यापकांची आवश्यकता आहे. मात्र महाविद्यालय व्यवस्थापनाकडून सर्व विभागांच्या तासिकांचे नियोजन कसे काय करता असा प्रश्न गणेश वाईरकर यांनी विचारला. तुम्ही अध्यापनाचे काम करता म्हणूनच शासन स्तरावरून भरती प्रक्रिया होत नाही. तुम्ही अध्यापनाचे काम थांबवा मग आपोआपच प्राध्यापक नियुक्त केले जातील. असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तासिकांचे नियोजन करताना मोठी कसरत असते. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कार्यरत असलेले सर्व प्राध्यापक मेहनत घेतात. प्राध्यापक नियुक्ती प्रक्रिया शासनस्तरावर सुरु आहे. प्राध्यापक भरतीसाठी प्रशासनाने पाठपुरावा केला आहे, असे प्राचार्य शिरभाते यांनी सांगितले. येत्या १५ दिवसात प्राध्यापक नियुक्त न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेने दिला.
पदे भरण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन : काळसेकर
मालवण : मालवण-कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथील प्राध्यापकांच्या ४५ रिक्त पदापैकी १२ पदांची तत्काळ भरती केली जाणार आहे. तर महाराष्ट्रात ‘एमपीएससी’तून भरणा केल्या जाणाऱ्या १७०० पदातून तंत्रनिकेतन मधील उर्वरित रिक्त पदे भरती केली जावून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाविद्यालयात प्राध्यापकांची ५९ पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ १४ पदे भरण्यात आली आहे. सुमारे ४५ प्राध्यापकांची आवश्यकता आहे. याबाबत मंगळवारी भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने मालवण शासकीय तंत्रनिकेतनला भेट दिली. यावेळी भाऊ सामंत, विजय केनवडेकर, भगत, अमृत सावंत, प्रभाकर सावंत, आप्पा लुडबे, संदीप शिरोडकर, विनोद भोगावकर, बबन परुळेकर, अजिंक्य परब, शशिकांत शिंदे, विजय कांबळी, गजानन वेंगुर्लेकर, देवेंद्र सामंत यासह अन्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. हॉटेल ओयासीस भरड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. रेशन दुकानावरील धान्याचाही प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मारहाण प्रकरणामुळे डॉक्टर येत नाहीत
जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचा गंभीर प्रश्नाबाबत काळसेकर म्हणाले, जिल्ह्याला विशेष बाब म्हणून डॉक्टर उपलब्ध करून दिले जातील. मात्र काँग्रेसच्या मारहाण प्रकरणामुळे जिल्ह्यात डॉक्टर येत नाहीत, असेही काळसेकर यांनी सांगितले.