वाचन संस्कृतीसाठी ‘स्वच्छंद’ सारखे कार्यक्रम व्हावेत-- ए. डी. कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:08 PM2017-10-09T22:08:04+5:302017-10-09T22:12:41+5:30
खारेपाटण : भारताचे माजी राष्टÑपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून शासनाने जाहीर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खारेपाटण : भारताचे माजी राष्टÑपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून शासनाने जाहीर केला आहे. मराठी साहित्याच्या वाचनाची आवड लोकांमध्ये निर्माण होण्यासाठी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना साहित्यातून प्रेरणा मिळण्यासाठी स्वच्छंदसारखे कार्यक्रम होणे काळाची गरज आहे, असे मत खारेपाटण येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे यांनी व्यक्त केले.
गो. वि. तथा विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या समग्र साहित्य निर्मितीचे दर्शन घडविणारा ‘स्वच्छंद’ कार्यक्रम खारेपाटण येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते.
डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘स्वच्छंद’ या कार्यक्रमाचे चौथे पुष्प रविवारी खारेपाटणमध्ये सादर करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका योगिनी रानडे, पर्यवेक्षक विलास फराकटे, एन. टी. शिंदे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सादरीकरण वामन पंडित, माधव गावकर, अनिल फराकटे, प्रसाद घाणेकर, विद्या गौरी यांनी केले. यावेळी विंदा करंदीकरांच्या ‘माझ्या मना दगड बन’, ‘तेच ते’ ‘चेडवा ये गो माझ्या घरी’ ‘नाचा भावय’ ‘मुक्ती मधले मोल हरवले’, ‘माळ्यावरचा ट्रंक’ आदी महत्त्वाच्या कवितांचे संगीतबद्ध वाचन करण्यात आले.
प्राचीन ओव्यांचे रूपांतर अर्वाचिन साहित्यात करण्यात विंदा यांचे योगदान आहे. साठीची गझल देखील रसिकांची दाद घेऊन गेली. आरती प्रभू यांच्यातील आरतीची गझल देखील सादर करण्यात आली. भारतीय मराठी साहित्याचे विरुपीकरण करणारी ‘विरुपिका, ‘कर कर करा-मर मर मरा’ या कविता वाचून दाखविण्यात आल्या.तसेच करंदीकरांच्या बालकवितांचेही सादरीकरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद खरात, प्रा. शोभा देसाई यांनी केले, तर स्वच्छंद कार्यक्रमाचे निवेदन वामन पंडित यांनी केले.
खारेपाटण येथील महाविद्यालयात ‘स्वच्छंद’ हा कार्यक्रम वामन पंडित यांनी सादर केला. यावेळी अनिल फराकटे, विद्या गौरी, प्रसाद घाणेकर, माधव गावकर आदी उपस्थित होते.