‘महानिर्मिती’विरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक
By admin | Published: September 22, 2015 09:08 PM2015-09-22T21:08:04+5:302015-09-22T23:55:21+5:30
फसवणुकीचा आरोप : वयोमर्यादेमुळे प्रशिक्षणार्थी घरी
शिरगाव : महानिर्मिती कंपनीकडून प्रकल्पग्रस्तांची फसवणूक झालेली आहे. आज आपण कामावर केवळ प्रशिक्षणार्थी म्हणून आहोत. शासन निर्णयानुसार उद्या वयाचे कारण सांगून घरी पाठवण्यात येतील. त्यामुळे या अन्यायाविरुध्द न्यायालयात जाण्याचा इशारा सेवासमाप्ती केलेल्या प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.महानिर्मिती कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. जलसंपदा खात्यामार्फत पन्नास वर्षांपूर्वी जमीन संपादित केलेल्या प्रकल्पग्रस्तांना दाखला दिला. नोकऱ्या मिळाल्या नाहीत म्हणून वारंवार संघर्ष केल्यावर प्रशिक्षणार्थी म्हणून दाखल केले. त्यावेळी दिलेल्या पत्रात आपणास सेवेत घेईपर्यंत प्रशिक्षणार्थी म्हणून राहावे लागेल, अशी स्पष्ट सूचना आहे. प्रकल्पग्रस्तांनी आपण आयुष्यभर प्रशिक्षणार्थी म्हणूनच राहावे काय? असा सवाल केला आहे.तथापि ३ वर्षांहून अधिक काळ गेल्यानंतर ४५ वर्षे झाली. यापुढे सेवेत घेता येणार नाही, असे सांगून मूळ कागदपत्र स्वत:कडे ठेवून सेवासमाप्तीची नोटीस कंपनीने दिली आहे. अनेक ठिकाणी साकडे घातल्यानंतर याबाबत शासन कोणताच निर्णय देत नसल्याने यापुढे महाराष्ट्रात अशा उमेदवारांना वयोमर्यादा ४५ वर्षे झाल्यावर घरी जावे लागणार आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. जमिनी विकूनही नोकरी नाहीच, उलट प्रशिक्षणार्थी म्हणून मिळालेली संधीही काढून घेण्यासाठी ही चाल असल्याचा आरोप होत आहे.केवळ प्रशिक्षण २००० ते ६००० पर्यंत विद्यावेतन देऊन प्रकल्पग्रस्तांना घरी पाठवणे हा अन्याय असल्याची भावना अलोरे पंचक्रोशीतून व्यक्त होत आहे. महाजनकोतील मान्यताप्राप्त संघटनांनी आजवर त्यांच्यासाठी आम्ही लढा देत असल्याचे आश्वासन दिले. मात्र, कोणताच सकारात्मक निर्णय झालेला नाही. (वार्ताहर)
न्यायालयात जाण्याचा इशारा
वयाचे कारण सांगून कोणत्याही क्षणी कामावरुन कमी करण्याची भीती.
अन्यायाविरुध्द न्यायालयात जाण्याचा प्रकल्पग्रस्तांचा इशारा.
जलसंपदा खात्यातर्फे पन्नास वर्षांपूर्वी जमिनी खरीदल्याचा दाखला.
वारंवार संघर्ष केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षणार्थी म्हणून संधी.
सेवेत घेईपर्यंत प्रशिक्षणार्थी म्हणूनच राहावे लागणार, कंपनीच्या पत्रात सूचना.