कारागृहाच्या संरक्षक भिंतींची उंची वाढवणार
By admin | Published: December 29, 2015 10:13 PM2015-12-29T22:13:40+5:302015-12-30T00:44:44+5:30
प्रस्ताव तयार : सुरक्षेच्या दृष्टीने उपाय
सावंतवाडी : सावंतवाडीतील कारागृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारागृह प्रशासनाने कारागृहाची संरक्षक भिंत पाच फुटाने वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याने आता या भिंतीची उंची १७ फूट होणार आहे. उंची वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या सुरू असून, या प्रस्तावाला जिल्हाधिकारी स्तरावर मान्यता घेण्यात येणार असल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. तसेच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनीही तातडीने निधी देण्याचे कबूल केले आहे.
सावंतवाडीतील कारागृह हे अडीच एकर जागेत बांधण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती असल्याने आजूबाजूला घरे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच सावंतवाडी कारागृह चर्चेत राहिले आहे. अट्टल चोरटा ज्ञानेश्वर उर्फ माऊली लोकरे हा या कारागृहातून पळून गेल्यानंतर या कारागृहाची सुरक्षा आणखी धोक्यात आली होती. लोकरेसारखा प्रकार पुन्हा या कारागृहात घडू नये, यासाठी कारागृह प्रशासन विशेष गंभीर झाले आहे.
कारागृह अधीक्षक ए. एस. सदाफुले व जेलर हेमंत पाटील यांनी विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी बंदिवान नेहमी कामात असले पाहिजे. यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरूवात केली आहे. हे करीत असतानाच कारागृहाच्या बाबतही त्यांनी विशेष काळजी घेतली असून, सावंतवाडी कारागृहाची भिंत १२ फूट आहे. ती ५ फुटाने वाढवून १७ फूट करण्यात यावी, अशा प्रकारचा प्रस्ताव जेल प्रशासनाने तयार केला आहे. जेलच्या संरक्षक भिंतीवरूनच अट्टल चोरटा ज्ञानेश्वर उर्फ माऊली लोकरे हा पळून गेला होता. त्यामुळेच हा निर्णय घेतला असून, याबाबतचा प्रस्ताव कारागृह प्रशासन जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार असून, संरक्षक भिंतीची उंची वाढवण्यास नियोजनमधून पैसे देण्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले आहे. ही उंची वाढल्यास सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला फायदा होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कारागृहाच्या संरक्षक भिंतीची उंची फारच कमी असल्याचेही यावेळी सदाफुले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)