प्रचार संपला; जोडण्या सुरू
By admin | Published: February 19, 2017 10:58 PM2017-02-19T22:58:50+5:302017-02-19T22:58:50+5:30
निवडणूक यंत्रणा सज्ज : आज मतपेट्या होणार रवाना
कणकवली / रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा प्रचार रविवारी संपला आहे. उद्या, मंगळवारी मतदान होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४९८ तर रत्नागिरी जिल्ह्यात ६६२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंदिस्त होणार आहे.
अधिकृत प्रचार संपला असला तरी मतदानाच्या दिवसापर्यंत विविध प्रकारे छुपा प्रचार सुरूच राहणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप आणि घरोघरी प्रचाराचा धुरळा आता संपला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून आज, सोमवारी मतपेट्या रवाना होणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विक्रमी ६५२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीत जिल्हा परिषदेचे ५, तर पंचायत समितीचे ६ उमेदवारी अर्ज बाद ठरविले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या २२६ उमेदवारांपैकी ५३ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात ५० जागांसाठी १७३ उमेदवार राहिले आहेत. तसेच पंचायत समितीच्या १०० जागांसाठी ४१६ उमेदवारांपैकी १०० उमेदवारांनी माघार घेतल्याने ३१६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे या प्रमुख पक्षांसह अपक्ष तसेच बंडखोर उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत. काँग्रेसच्या ताब्यातील जिल्हा परिषद आपल्याकडे खेचून घेण्यासाठी शिवसेना तसेच भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकृतरीत्या या पक्षांची युती नसली तरी अनेक ठिकाणी छुपी युती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यात ६६२ उमेदवार रिंगणात
रत्नागिरी : जिल्हा परिषद व ९ पंचायत समितींच्या उद्या २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली राजकीय पक्षांच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी संपली. मात्र, त्याआधीच दोन दिवस छुप्या गाठीभेटींना वेग आला आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५५ तर जिल्ह्यातील ९ पंचायत समितींच्या ११० जागांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सेना, भाजप व राष्ट्रवादी-कॉँग्रेस आघाडी अशा तिरंगी लढती होत आहेत, तर काही ठिकाणी कॉँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात आहे. गेल्या महिनाभरापासून या जिल्ह्यातील गावागावांमध्ये प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू होती.
भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिवसेनेतर्फे पर्यावरणमंत्री रामदास कदम, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, तर राष्ट्रवादीतर्फे आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम यांनी स्टार प्रचारक म्हणून काम पाहिले. प्रत्येक उमेदवाराचे स्वतंत्र निवडणूक वचननामा पत्रकही मतदारांपर्यंत पोहोचले आहे. त्यानंतर पक्षाचा जाहीरनामाही मतदारांच्या हाती देण्यात आला आहे. काही उमेदवारांच्या प्रचारात महिलांच्या गटांनीही आघाडी घेतली. (प्रतिनिधी)