प्रचारतोफा आज थंडावणार
By admin | Published: February 18, 2017 11:17 PM2017-02-18T23:17:25+5:302017-02-18T23:17:25+5:30
राजकीय धुळवड थांबणार : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ५५ आणि पंचायत समितीच्या ११0 जागांसाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत आज, रविवारी संपणार आहे. तब्बल ६६२ उमेदवार रिंगणात असून, शिवसेनेतील नाराजी, एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, भाजपमधील इन्कमिंग, राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद एवढ्याच गोष्टी या निवडणुकीत गाजल्या आहेत. रात्री १२ पर्यंत प्रचारास वेळ दिल्याने रविवार हा प्रचाराचा वार ठरणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम यंदा अत्यंत घाईचाच ठरला असून, अर्ज माघारी सोमवार, दि. १३ रोजी घेण्यात आले. अर्ज मागे घेतल्यानंतर प्रचारासाठी केवळ सहाच दिवस मिळाले. त्यामुळे निवडणुकीत खरी रंगत आली. जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी २३७, तर पंचायत समितीच्या ११0 जागांसाठी ४२५ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना आणि भाजप या निवडणुकीत स्वबळावर आमने-सामने आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाच तालुक्यांत आघाडी केली आहे आणि तीन तालुक्यांत हे दोन पक्षही आमने-सामने लढत आहेत.शिवसेनेत इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे साहजिकच उमेदवारी न मिळालेल्या नाराजांना भाजपने आपल्याकडे वळवले. काही नाराजांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.दापोलीमध्ये पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यातील शीतयुद्धामुळे शिवसेनेत जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. हेच यावेळेच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात प्रचार सभा कमीच
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रचारासाठी जिल्ह्यात अत्यंत कमी जाहीर सभा झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याच जाहीर सभा झाल्या. राणे यांची राजापुरातील सभा वगळता उर्वरित सभा या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातच झाल्या आहेत. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकही जाहीर सभा झालेली नाही.
रविवार ठरणार प्रचार वार
आज, रविवारी सायंकाळी प्रचार संपणार आहे. त्यातच रविवार असल्यामुळे प्रचारावर अधिक भर देण्याची तयारी सर्वच पक्षांनी केली आहे. सध्या आंबा बागायतीच्या कामांमुळे ग्रामीण भागातील लोक दिवसभरात घरी भेटत नाहीत. त्यामुुळे रविवारी सकाळपासूनच प्रचार सुरू करण्याची तयारी राजकीय पक्षांनी केली आहे.
बंडखोरांची हकालपट्टी
या निवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या आठजणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रथमच अशी तडकाफडकी कारवाई करण्यात आली आहे. या आठजणांमध्ये राजापुरातील सात आणि रत्नागिरीतील एका शिवसेना पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.
आचारसंहिता भंगाची
एकच तक्रार
आचारसंहिता जाहीर झाल्यापासून जिल्ह्यात आचारसंहिता भंगाची केवळ एकच तक्रार दाखल झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना कृषी अंदाजपत्रकासाठी केलेल्या तरतुदींचा मुद्दा जाहीर करून आचारसंहिता भंग केला असल्याची तक्रार काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी निवडणूक विभागाकडे केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी
तथा निवडणूक आदर्श आचारसंहिता
कक्षा समिती प्रमुख सारंग कोडोलकर
यांनी ही तक्रार चिपळूण प्रांताधिकारी
तथा चिपळूणचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी
पाठविली आहे.