शांतता असेल तरच समृध्दी
By admin | Published: September 1, 2014 09:12 PM2014-09-01T21:12:49+5:302014-09-01T23:57:40+5:30
के. सी. चौरे : दोडामार्ग येथे तंटामुक्त पुरस्काराचे वितरण
दोडामार्ग : तंटामुक्त गाव मोहीमेचे ब्रीद हे शांततेतून समृद्धीकडे असे आहे. त्यामुळे शांततेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शांतता ज्याठिकाणी असेल त्याच ठिकाणी समृद्धी नांदेल, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी के. सी. चौरे यांनी केले.
दोडामार्ग तालुक्यातील तंटामुक्त पुरस्कारप्राप्त गावांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात तहसील कार्यालयाच्या सभागृहात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार संतोष जाधव, पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार आदी उपस्थित होते.
दोडामार्ग तालुक्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेतील पुरस्कारप्राप्त गावांना प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना चौरे म्हणाले, प्रत्येकाने आचारसंहितेचे पालन केले पाहिजे, सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. मग कोणताही प्रश्न सहज सुटेल. गावात असणारा तंटा, वाद- विवाद तडजोडीने सोडविण्यावर भर दिला गेला पाहिजे. हे सर्व झाले तर गावाची शांतता टिकून राहील. प्रत्येक गावाने असा प्रयत्न केला की, तालुका आपोआप तंटामुक्त होईल. यासाठी सर्वप्रथम प्रत्येकाने स्वत:पासून सुरूवात करायला हवी. तहसीलदार संतोष जाधव, पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनीही यावेळी समयोजित मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)