हत्तींपासून संरक्षण द्या!, केर-भेकुर्ली ग्रामपंचायतीची वनविभागाकडे मागणी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 7, 2023 06:52 PM2023-04-07T18:52:08+5:302023-04-07T18:52:24+5:30
दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) : केर-भेकुर्ली ग्रामपंचायत हद्दीत सध्या सहा रानटी हत्ती ठाण मांडून असून संपूर्ण गावात भीतीचे वातावरण ...
दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : केर-भेकुर्ली ग्रामपंचायत हद्दीत सध्या सहा रानटी हत्ती ठाण मांडून असून संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे तात्काळ आमच्या गावात वनकर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी पाठवून आमचे सरंक्षण वाढवा व हत्ती पकड मोहीम हाती घ्या अशी मागणी केर भेकुर्ली ग्रामपंचायतने दोडामार्ग वनक्षेत्रपाल ए. आर. कन्नमवार यांना निवेदन देत केली आहे.
केर-भेकुर्ली ग्रामपंचायत हद्दीत यापूर्वी दोन रानटी हत्तींचा वावर होता. आता यात आणखी चार हत्तींची वाढ होऊन हत्तींची संख्या सहा वर गेली आहे. या सहाही हत्तींनी गावात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
शिवाय सध्या काजू हंगाम सुरू आहे. तसेच हत्ती आता जंगल भाग सोडून गावाच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्तींकडून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी देखील केर गावाला हत्तींनी तडाखा दिला होता व मोठी नुकसानीही केली होती. आताही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सत्र सुरूच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या खात्याकडून वाढीव सरंक्षण मिळावे व हत्ती पकड मोहीम राबवावी हीच आमची प्रमुख मागणी असल्याचे केर-भेकुर्ली ग्रामपंचायतने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.