सुरक्षारक्षक, कामगार संस्थेने पारदर्शीपणा सिध्द करावा
By admin | Published: May 20, 2015 10:01 PM2015-05-20T22:01:38+5:302015-05-21T00:07:48+5:30
समविचारी मंच : नोंदणी शुल्क भरल्यानंतर काहीच न कळवल्याने संभ्रम
रत्नागिरी : बेरोजगारांच्या फसवणुकीचा अवलंब करीत एकामागोमाग एक प्रकार रत्नागिरीत उघड होत असतानाच सुरक्षारक्षक भरती आणि सेवा देणाऱ्या एका संस्थेचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न समविचारी मंचने केल्याने संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या संस्थेने आपले पारदर्शक कामकाज जाहीर करावे, अशी मागणी समविचारी मंचचे प्रमुख बाबा ढोल्ये, जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर, तालुकाध्यक्ष संजय नागवेकर, सरचिटणीस तुकाराम दुड्ये, युवा आघाडीप्रमुख नीलेश आखाडे यानी केली आहे.
राज्य सुरक्षारक्षक अॅण्ड जनरल कामगार युनियन, मुंबई या नावाने रत्नागिरी कुवारबाव येथे सुमारे दोन वर्षे संलग्न कार्यालय सुरु आहे. स्थानिक बेरोजगारांनी समविचारींशी संपर्क साधून रत्नागिरी शाखेविषयीच्या आपल्या तक्रारी मांडल्या. त्यानुसार, प्रत्येक बेरोजगार युवकाकडून तीनशे रुपये प्रवेशशुल्क वसूल करण्यात येते. सुरक्षारक्षकाची सेवा पुरवण्याची तोंडी हमी देऊन उमेदवारांना लेखी, तोंडी, परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि इतर सेवा शर्ती पूर्ण केल्यावर सेवा देण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचे संबंधित उमेदवारांनी यावेळी स्पष्ट केले.
कुवारबाव येथील कार्यालयात समविचारींनी संस्थेचे प्रत्यक्ष कामकाज आणि सत्यासत्यतेची पडताळणी करण्यासाठी धडक मारली. त्यावेळी हे कार्यालय मागील आठवडाभर बंद आहे.
कार्यालयाच्या अनियमीत कामकाजामुळे अनेक बेरोजगारांना पायपीट करावी लागत असल्याचे निदर्शनास आले. अनेक बेरोजगारांनी नोंदणी शुल्क भरुन गेले कित्येक महिने आम्हा बेरोजगारांना कोणतीही परीक्षा वा इतर काहीच न कळवल्याने या संस्थेविषयी संशयाची भावना निर्माण झाली असल्याचे ढोल्ये यांनी यावेळी सांगितले.
बंद कार्यालयावरील नमूद असलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधताच कार्यालय उघडण्याची परवानगी मला नाही, असे सांगून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे संपर्क नंबर दिले. यावेळी या कार्यालयाविषयी असणारे आक्षेपांचे निराकरण करून संस्था कार्यपद्धती, पुरविलेले रोजगार, सदस्य संख्या शासकीय मान्यता, नोंदणीची सत्यता याविषयीचे शंका निरसन येत्या आठवड्यात करावे अन्यथा कार्यालय चालू करु देणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर, युवा प्रमुख नीलेश आखाडे यांनी यावेळी दिला.
समविचारी मंचचे प्रमुख बाबा ढोल्ये यांनी या संस्थेविषयी आलेल्या तक्रारींची शहानिशा झालीच पाहिजे, असे सांगून स्थानिक उमेदवारांच्यावतीने आम्ही जरुर पडल्यास पुढील आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना यापूर्वीच पत्र दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)