सुरक्षारक्षकांचे उपोषण अद्याप सुरुच
By admin | Published: December 10, 2014 10:46 PM2014-12-10T22:46:35+5:302014-12-10T23:45:13+5:30
एकाची प्रकृती ढासळली : सुरक्षा अधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी भेट, आंदोलनाचा तिसरा दिवस
कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथील एजन्सी नोंदणीकृत नसल्याने कायमस्वरुपी नोकरी असूनही नोकरी न मिळाल्याने वीस सुरक्षारक्षकांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू होते. यातील रवींद्र साळवी या उपोषणकर्त्या सुरक्षारक्षकाची प्रकृती ढासळली. रत्नागिरीतील सुरक्षा अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
कुडाळ येथील सुरक्षारक्षकांचा लढा अजूनही सुरुच आहे. या उपोषणाचा बुधवारी तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवशीही या आंदोलनाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. प्रशासन आणि उपोषणकर्ते दोन्हीही आपापल्या निर्णयावर ठाम राहिल्याने उपोषण अजूनही सुरुच आहे. दरम्यान उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली. मात्र तरीही आंदोलन सुरूच आहे. जोपर्यंत नोकरी मिळत नाही, तोपर्यंत ते सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कुडाळ एमआयडीसी येथे या अगोदर सुरक्षारक्षक एजन्सीच्यावतीने सुरक्षारक्षकांची नियुक्ती गेली अनेक वर्षे करण्यात आली होती. आता एमआयडीसी प्रशासनाच्या नवीन ध्येयधोरणांनुसार या ठिकाणी कायमस्वरुपी सुरक्षारक्षकांची भरती करण्यात आली. परंतु या भरतीमुळे अगोदर कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना नोकरी गमवावी लागली. गेली अनेक वर्षे येथे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी केलेल्या व आता नोंदणीकृत नसल्यामुळे नोकरी गमावण्याची वेळ आलेल्या या २० सुरक्षारक्षकांसमोर कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, अशी समस्या उभी आहे. त्यामुळे या सुरक्षारक्षकांनी आमची सुरक्षारक्षक म्हणून नोंदणी करून घेऊन आम्हाला सेवेत घ्यावे, अन्यथा आंदोलन मागे घेणार नाही, असे सांगत सोमवारी सकाळपासून कुडाळ एमआयडीसी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
प्रकृती ढासळली
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी कुडाळ तालुक्यातील भडगाव येथील रहिवासी रवींद्र साळवी (वय ४५) यांची प्रकृती ढासळली. त्यांना रुग्णालयात दाखल करणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. या घटनेमुळे आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांची निव्वळ चर्चा
उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी बुधवारी रत्नागिरी येथील सुरक्षा अधिकारी संदेश अहिरे आले होते. त्यांनी उपोषणकर्त्यांचे नेते काका कुडाळकर, संजय भोगटे, बंड्या सावंत, किरण शिंदे यांच्याशी चर्चा केली. मात्र, नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय वरिष्ठांचाच असल्याचे सांगण्यात आले. यावेळी एमआयडीसी उपअभियंता रेवणकर हेदेखील उपस्थित होते. मात्र, या चर्चेअंती कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत नोकरीत सामाविष्ठ करुन घेतले जात नाही तोपर्यंत लढत राहण्याचे धोरण अवलंबण्याचे ठरविले आहे.