'दिल्लीतलो चायवालो खय ऱ्हवलो म्हागायचो चटको गरीबाक गावलो, कणकवलीत ठाकरे गटाचे महागाई विरोधात आंदोलन
By सुधीर राणे | Published: March 28, 2023 04:05 PM2023-03-28T16:05:45+5:302023-03-28T16:06:38+5:30
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.
कणकवली: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला आघाडीच्या महिलांनी एकत्र येत वाढत्या महागाईमुळे केंद्र व राज्य शासनाचा निषेध करीत अप्पासाहेब पटवर्धन चौकात महागाई विरोधी 'चाय पे चर्चा' आणि 'चुलीवरची भाकरी' हे अनोखे आंदोलन केले. शिवसेनेच्या रणरागिणींनी या आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी देत शासनाचा निषेध केला.
महिलांनी चुलीवर चहा व भाकरी तयार करून महागाईचा निषेध केला. 'भाओजी, भाओजी, महागाईचे खोके, एकनाथ म्हणतत सगळंच ओके', 'दिल्लीतलो चायवालो खय ऱ्हवलो म्हागायचो चटको गरीबाक गावलो', 'गाडी इली ,गाडी इली गॅस सिलेंडरची गाडी इली, बायका पोरा चीडीचाप झाली', 'आनंदाचो शिधो मिळालो काय गो साखर, तांदळाचा पोता पळाला खय गो', 'पन्नास खोके, महागाई ओके', 'मोदी सरकारचा करायचा काय? खाली डोके वर पाय', 'निषेध असो, निषेध असो, भाजप सरकारचा निषेध असो' अशा विविध घोषणा देत शिंदे व मोदी सरकारचा निषेध केला.
यावेळी ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नीलम सावंत- पालव, तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, महिला उपतालुकप्रमुख संजना कोलते, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विखाळे, मानसी मुंज, दिव्या साळगावकर, माधवी दळवी, प्रतिभा अवसरे, रोहिणी पिळणकर, संजना साटम, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर यांच्यासह दोनशेहून अधिक महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
त्यानंतर अप्पासाहेब पटवर्धन चौकातून बाजारपेठ ते झेंडा चौकातून तेलीआळीमार्गे कणकवली तहसीलदार कार्यालयापर्यंत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार आर. जे. पवार यांना अन्यायकारक गॅस दरवाढ मागे घेण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.