पॅरिस हल्ल्याचा कुडाळ येथे निषेध
By admin | Published: November 20, 2015 09:12 PM2015-11-20T21:12:02+5:302015-11-21T00:16:52+5:30
कर्नल संतोष महाडीक यांना श्रद्धांजली
कुडाळ : पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समितीच्यावतीने कुडाळ गांधी चौक येथे जाहीर निषेध करण्यात आला. तर जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडीक यांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध सिंधुदुर्ग जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समितीच्या सदस्यांनी कुडाळ गांधी चौक येथे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास एकत्र येत केला. यावेळी समितीचे जिल्हा अध्यक्ष मुश्ताक शेख, हाफीज नाझीम, कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट, अन्वर खान, मुफ्ती सर्फराज मौलाना, अब्दुल रहुफ, हमीद शेख, हसन मकानदार, समद शेख व समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुश्ताक शेख म्हणाले की, आतंकवादी हल्ल्यात अनेक निरपराधी लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आतंकवाद्यांना थारा दिला तर अशाच घटना वारंवार घडतील आणि अराजकता माजेल. आतंकवादाला नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.
यावेळी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या सातारा कर्नल संतोष महाडीक यांनाही समितीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात
आली. यावेळी मुस्मिल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)