दाणोली-बांदा रस्त्याला विरोध, बांधकाम विभागाकडून कार्यक्रमस्थळी उभारलेला सभामंडप ग्रामस्थांनी जाळला
By अनंत खं.जाधव | Published: October 11, 2024 03:44 PM2024-10-11T15:44:55+5:302024-10-11T15:45:17+5:30
घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त: कार्यक्रमस्थळ ही बदलले
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील दाणोली बांदा रस्ता सुधारणा करण्याच्या कामाला बावळाट विरोध करत बांधकाम विभागाकडून कार्यक्रमस्थळी उभारलेला सभामंडप संतप्त ग्रामस्थांनी आज, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जाळून टाकला. तसेच हा रस्ता करत असताना आम्हाला विश्वासात घेण्यात आले नसून रूदीकरणात किती घरे जाणार, कुणाची जागा घेणार ते पहिले सांगा नंतरच या रस्त्याला परवानगी देऊ असे सांगितले. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने काम करत असताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जाईल असे स्पष्ट केले. त्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
दरम्यान या घटनेचे गांभीर्य ओळखून मोठ्याप्रमाणात पोलिस फौजफाटा कार्यक्रमस्थळी दाखल झाला होता. पण ग्रामस्थांच्या विरोधानंतर कार्यक्रमस्थळात बदल करून माडखोल येथे हलविण्यात आले. तेथे हा कार्यक्रम शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
दाणोली बांदा या रस्त्यांच्या सुधारणा करण्यासाठी आशियाई विकास बँक व केंद्र शासनाच्या सहाय्याच्या माध्यमातून या रस्त्याचे भुमिपूजन शुक्रवारी सकाळी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार होते. तर बावळाट येथे प्रत्यक्षात कार्यक्रमाचे भुमिपूजन होणार होते. त्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार होते.
हा कार्यक्रम होणार म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सभामंडप ही घालण्यात आला होता. पण ही बातमी गावात पसरताच गावात एकच खळबळ उडाली. जर हा रस्ता करताना आम्हाला कुणालाच विश्वासात घेण्यात आले नसल्याचे सांगत ग्रामस्थांनी रस्त्यालाच विरोध केला. तसेच उभारलेला सभामंडप अज्ञातांनी जाळून टाकला.
या घटनेची माहिती मिळताच मंत्री केसरकर, अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळावर येऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत तक्रार निवारण करा अशी सक्त ताकीद दिली. त्यानंतर ग्रामस्थ व बांधकाम अधिकारी यांच्यातील चर्चेनंतर प्रत्यक्षात काम सुरू करत असताना स्थानिकांना विश्वासात घेतले जाईल असे बांधकामकडून स्पष्ट केले. त्यानंतर मंत्री केसरकर यांच्या सूचनेनुसार त्यांना पत्र ही देण्यात आले असून तेव्हा स्थानिक ग्रामस्थ शांत झाले. मात्र बावळाट येथे ठरलेला कार्यक्रम माडखोल येथील साई मंदिर परिसरात घेण्यात आला.
सभामंडप जळाला त्याला मंत्री केसरकराकडून मदतीचा हात
ज्यांनी कार्यक्रम स्थळावर सभामंडप उभारला होता तो सभामंडप अज्ञाताकडून जाळून टाकण्यात आला होता. हा सभामंडप जाण्यानंतर लक्ष्मण वरक हा तरूण चांगलाच भावनाविवश झाला होता त्याला मंत्री केसरकर यांच्याकडून साठ हजार रूपयांचा धनादेश देत त्याला मदतीचा हात दिला.
आमचे समाधान होत नाही तोपर्यंत विरोध: सरपंच
हा रस्ता करत असतना बांधकाम विभागाकडून आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही.तसेच आमच्या जागा किती जाणार हे आम्हाला माहित नाही म्हणून आम्ही याला विरोध करत असून जोपर्यंत आमचे समाधान होत नाही तोपर्यंत आमचा विरोध राहिल असे बावळाट सरपंच सोनाली परब उपसरपंच स्वप्निल परब यांनी स्पष्ट केले.