कुडाळात निषेध रॅली, केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 07:54 PM2020-01-10T19:54:52+5:302020-01-10T19:56:56+5:30
केंद्र सरकारच्या आक्रमक कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने कुडाळ शहरात निषेध रॅली काढत देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभाग घेण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कुडाळ : केंद्र सरकारच्या आक्रमक कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने कुडाळ शहरात निषेध रॅली काढत देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभाग घेण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्र सरकारच्या आक्रमक कामगार कायद्याविरोधी धोरणांना अटकाव घालण्यासाठी व विविध मागण्यांसाठी देशभरातील बहुतांशी कामगार संघटनांनी एकत्र येऊन ८ जानेवारी रोजी संपूर्ण भारतात देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक दिली होती.
या संपात महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन कुडाळच्यावतीनेही सहभाग घेण्यात आला. बुधवारी कुडाळ शहरातून रॅली काढत केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. तसेच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी संपकर्त्यांनी भाववाढ रोखण्यात यावी, कोट्यवधी बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती करावी, रोजगार व योग्य पगार यांचा मूलभूत हक्कांत समावेश करावा, रोजगाराची सुरक्षितता द्यावी, कायमस्वरूपी काम बाह्य स्त्रोत बंद केले जाऊ नये, कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल करण्यात येऊ नयेत, कामगार संघटनांचे हक्क अबाधित ठेवण्यात यावेत, सामाजिक सुरक्षितता योजनात कपात करण्यात येऊ नये, किमान वेतन २१ हजार निश्चित करावे, सर्वांसाठी पेन्शन आणि बोनस लागू करण्यात यावा, नवीन पेन्शन योजना रद्द करावी, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करण्यात येऊ नये, बँकांचे एकत्रीकरण तसेच खासगीकरण करण्यात येऊ नये, बँकेच्या ठेवीवरील व्याजदर वाढवण्यात यावेत, बँकातील थकित कर्ज पूर्णता आणि त्वरित वसूल करण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.