खारेपाटण वीज उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी निधी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला २४ तास वीजपुरवठा करा; नितेश राणेंची मागणी
By सुधीर राणे | Published: September 27, 2022 04:07 PM2022-09-27T16:07:32+5:302022-09-27T16:08:33+5:30
खारेपाटण येथील अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे मालवण, कुंभारमाठ, पेंडूर, आचरा, तळेबाजार, जामसंडे, देवगड, वाडा, वैभववाडी, खारेपाटण येथील ३३/११ के.व्ही.वरील वीज पुरवठा बाधित झाला होता.
कणकवली : सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला २४ तास वीजपुरवठा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हयाला कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील २२०/१३२ के.व्ही. तसेच सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील २२०/१३२ के.व्ही.च्या अति उच्चदाब केंद्रातून विद्युत पुरवठा होत आहे. २२ सप्टेंबर २०२२ रोजी खारेपाटण येथील अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे मालवण, कुंभारमाठ, पेंडूर, आचरा, तळेबाजार, जामसंडे, देवगड, वाडा, वैभववाडी, खारेपाटण येथील ३३/११ के.व्ही.वरील वीज पुरवठा बाधित झाला होता. त्यामुळे सुमारे १,२०,००० ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ आली.
सिंधुदुर्ग जिल्हयाला विद्युत पुरवठा करणाऱ्या इन्सुली व खारेपाटण या दोन अति उच्चदाब केंद्रांपैकी एखाद्या केंद्रात भविष्यात अशा प्रकारचा बिघाड निर्माण झाल्यास दुसऱ्या केंद्रातून विद्युत पुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था निर्माण झाल्यास ग्राहकांची गैरसोय होणार नाही. पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्यात २४ तास सुरळीत विद्युत पुरवठा सुरू असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आपल्या स्तरावरून त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे खारेपाटण येथील महापारेषणचे वीज उपकेंद्र आगीमुळे नादुरूस्त झाल्याने त्याचे दुरुस्तीसाठी आवश्यक निधीची उपलब्धता त्वरीत करून देण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे.