खेळाडूंना सर्व सुविधा पुरविणार
By admin | Published: March 30, 2015 08:38 PM2015-03-30T20:38:49+5:302015-03-31T00:29:29+5:30
दीपक केसरकर : सावंतवाडीत कबड्डी स्पर्धेस प्रारंभ
सावंतवाडी : कबड्डी खेळाडूंसाठी सावंतवाडी शहरात गॅलरी उभी करावी, यासाठी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह वरिष्ठ पातळीवर चर्चा करून गॅलरीसाठी प्रयत्न करणार व सिंधुदुर्गातील सर्व क्षेत्रातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. पुणेरी पलटन युवा प्रतिभा शोध २०१५ व जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन येथील जिमखाना मैदानावर रविवारी करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, पुणेरी पलटन संघाचे व्यवस्थापक राहुल सापटे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष संभाजी पाटील, सिंधुुदुर्ग जिल्हा युथ अध्यक्ष डॉ. श्रीनिवास गावडे, डॉ. कश्यप देशपांडे, जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ संस्थापक विजयदादा जाधव, राष्ट्रीय खेळाडू पुणे पलटन सागर खटाळे, जय महाराष्ट्र क्रीडा मंडळचे सचिव अजय जाधव, अध्यक्ष उमाकांत वारंग, उपाध्यक्ष श्रीपाद शास्त्री, खनिजदार गणेश जाधव, नगरसेवक संजय पेडणेकर, नगरसेविका अफरोज राजगुरू, क्षिप्रा सावंत, शर्वरी धारगळकर, शुभांगी सुकी, कीर्ती बोंद्रे आदी उपस्थित होते.
पुणेरी पलटन युवा प्रतिभा शोध हे मंडळ संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धा राबवित आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चांगल्या खेळाडूंना व्यासपीठ मिळेल, अशी आशा यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी व्यक्त केली. सागर बांदेकर, विजय जाधव यांच्यासारख्या चांगल्या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धा गाजविल्या आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले खेळाडू निर्माण होऊ शकतात. येत्या काही महिन्यात कुमार गटाची स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. तसेच आपली क्रीडाशक्ती सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वापरा, असा सल्लाही केसरकर यांनी दिला. ग्रामीण भागात खेळाडूंना सुवर्णसंधी पुणेरी पलटन युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळत आहे. या सामन्यात आपले कौशल्य दाखवावे. अशा स्पर्धा महाराष्ट्रभर घेऊन युवा प्रतिभा शोध घेणार असल्याचे पुणेरी पलटन संघाचे व्यवस्थापक राहुल सापटे यांनी सांगितले. यावेळी कबड्डीतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्रेहा टिळवे, अर्चना अशोक देसाई, कल्पना अरुण चौगुले, दिया सावंत, युक्ता प्रमोद सावंत, महेश गिरकर, गणेश जाधव, सुनील पेडणेकर, दिनेश चव्हाण, किरण धारपवार, संजय पेडणेकर, रमा पेडणेकर, नितीन हडकर, बाबली बांदेकर, शैलेश नाईक या सर्वांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
जिल्ह्यासाठी अकरा कोटींचा पायलट प्रकल्प - साळगावकर
नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अकरा कोटींचा पायलट प्रकल्प राबविणार असून क्रीडाविषयक धोरण तयार केले आहे. यासंदर्भात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून सावंतवाडीत प्रकल्प उभारण्यासाठी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.