कणकवली पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 10:38 AM2021-03-17T10:38:23+5:302021-03-17T10:39:49+5:30
tourism Kankavli Sindhudurg- कणकवली शहर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी द्यावा. अशी मागणी कणकवली नगरपंचायत मधील शिवसेनेचे गटनेते सुशांत नाईक व इतर नगरसेवकांनी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
कणकवली : कणकवली शहर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी द्यावा. अशी मागणी कणकवली नगरपंचायत मधील शिवसेनेचे गटनेते सुशांत नाईक व इतर नगरसेवकांनी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी पालकमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कणकवली शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय , सामाजिक व आर्थिकदृष्ट्या केंद्रबिंदू आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे. मात्र, कणकवली शहर गेली काही वर्षे पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यापासून दूर राहिले आहे. त्यामुळे शहरातील जानवली नदीलगत असलेल्या गणपती साना येथे सुसज्ज असे उद्यान व गणपती साना तसेच जानवली नदीकाठचा परिसर सुशोभिकरण व पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याकरिता तीन कोटींचा निधी देण्यात यावा.
कणकवलीचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास त्याचा शहरालाही फायदा होणार आहे. तसेच गेली काही वर्षे पर्यटनदृष्ट्या अविकसित राहिलेले कणकवली शहर यामुळे विकासाच्या दृष्टीने प्रकाश झोतात येणार आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा. असेही या पत्रात नगरसेवक सुशांत नाईक , कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, माही परुळेकर, मानसी मुंज, सुमेधा अंधारी यांनी म्हटले आहे.