पर्यटन विकासाकरिता निधीची तरतूद करा, कुणकेश्वर मंदिर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 01:37 PM2022-11-21T13:37:05+5:302022-11-21T13:38:14+5:30
आषाढी एकादशीला पंढरपूर येथे श्री विठ्ठलाची पूजा आपल्या हस्ते होते त्या पद्धतीत आपण श्री देव कुणकेश्वराच्या प्रथम महापूजेचा मान स्वीकारावा
देवगड : कोकणातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वराला भेट द्यावी व ज्या पद्धतीने आषाढी एकादशीला पंढरपूर येथे श्री विठ्ठलाची पूजा आपल्या हस्ते होते त्या पद्धतीत आपण श्री देव कुणकेश्वराच्या प्रथम महापूजेचा मान स्वीकारावा, अशी इच्छा कोकणवासीयांची आहे. तसेच पर्यटन विकासाकरिता जास्तीत जास्त निधीची तरतूद करावी, अशी मागणी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
१८ ते २० फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त ‘श्रीं’ च्या प्रथम महापूजेसाठी आमंत्रण पत्रदेखील देण्यात आले. १८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता प्रथम पूजा परंपरेनुसार केली जाणार आहे. श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट सदस्य व पदाधिकारी, कुणकेश्वर ग्रामपंचायत सरपंच यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, कुणकेश्वर ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत घाडी, देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, खजिनदार अभय पेडणेकर, विश्वस्त विजय वाळके, सचिव शरद वाळके, सदस्य संजय आचरेकर, सदस्य संतोष लाड उपस्थित होते.