LokSabha2024: जाहीर सभा घेऊन मतदानात फरक पडतो का?

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 8, 2024 12:44 PM2024-06-08T12:44:18+5:302024-06-08T12:46:39+5:30

जाहीर सभांमुळे मतांमध्ये काही फरक पडलेला दिसत नाही

Public meetings do not make much of a difference to votes during elections | LokSabha2024: जाहीर सभा घेऊन मतदानात फरक पडतो का?

LokSabha2024: जाहीर सभा घेऊन मतदानात फरक पडतो का?

सिंधुदुर्ग : निवडणूक काळात जाहीर सभांमुळे वातावरण निर्मिती होते, हे खरे असले तरी त्याचा मतांवर फारसा फरक पडत नाही, असे चित्र या निवडणुकीतून समोर आले आहे. महायुतीचे उमेदवार नारायण राणे किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आपापले पारंपरिक गड राखले आहेत. जाहीर सभांमुळे मतांमध्ये काही फरक पडलेला दिसत नाही.

कोणत्याही निवडणुकीसाठी जाहीर सभा घेतल्या जातातच. प्रचारासाठी वातावरण निर्मिती करणे हा त्यातील मुख्य उद्देश असतो. तो साध्य होतोच. पण सभा झाली म्हणून मतांमध्ये फरक पडला असे चित्र या मतदारसंघात दिसले नाही. प्रत्येक उमेदवाराने आपापला गड राखला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात राऊत आणि सिंधुदुर्गात राणे मताधिक्य घेतील, हे आधीपासूनच निश्चित होते आणि तसेच झाले. उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मेहनत यावरच निवडणुकीतील जयपराजप ठरतो.

महायुतीचे नारायण राणे ४७,८५८ मताधिक्याने विजयी

  • या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा ४७,८५८ मतांनी पराभव केला आहे.
  • राणे यांच्यासाठी अधिक जाहीर सभा झाल्या. राऊत यांनी खळा बैठकांवर अधिक भर दिला.


कोणाच्या किती सभा?

अमित शाह : केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची रत्नागिरीत जाहीर सभा झाली. मात्र, रत्नागिरी मतदारसंघात राणे यांना १० हजार मतांनी पिछाडीवर राहावे लागले.
उद्धव ठाकरे : उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्यासाठी कणकवली व रत्नागिरीत सभा घेतली. मात्र त्यांचे रत्नागिरीत मताधिक्य घटले तर कणकवलीत सर्वात मोठा फटका बसला.
राज ठाकरे : राज ठाकरे यांनी कणकवलीत सभा घेतली. तेथे राणेंना मोठे मताधिक्य आहे. पण सभेपेक्षाही राणे यांचे नियोजन महत्त्वाचे ठरले.
देवेंद्र फडणवीस : फडणवीस यांनी राजापुरात राणे यांच्यासाठी सभा घेतली. मात्र, तेथे विरोधी उमेदवार विनायक राऊत यांनी २१ हजारांचे मताधिक्य घेतले आहे.

नियोजन महत्त्वाचे

सिंधुदुर्गात राणे यांचे वर्चस्व असल्याने राऊत यांनी रत्नागिरी जिल्ह्यावर अधिक लक्ष दिले. त्याची कल्पना असल्याने राणे यांनी सिंधुदुर्गातून अधिक मताधिक्य मिळविण्याचे नियोजन केलेच, शिवाय त्यांनी रत्नागिरीतील विनायक राऊत यांचे मताधिक्य घटवण्यावरही भर दिला आणि या नियोजनामुळेच त्यांना विजय मिळू शकला.

इतर नेत्यांच्या सभा

या मतदारसंघात उद्धवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचीही दोन्ही जिल्ह्यांत सभा झाली. उद्धवसेनेचे वरुण सरदेसाई यांनी चिपळूण, सावंतवाडीमध्ये रोड शो केला. त्यामुळे त्या-त्यावेळी राजकीय वातावरण निर्मिती झाली, पण मतांमध्ये फरक पडला असल्याचे निकालात दिसले नाही.

Web Title: Public meetings do not make much of a difference to votes during elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.