पुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये, ज्येष्ठांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:58 PM2020-12-16T12:58:52+5:302020-12-16T13:03:27+5:30
Senior Citizen, Coronavirus Unlock, sindhudurg लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने ज्येष्ठ नागरिक आता घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये. त्यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करावे, असा सल्ला अनेक ज्येष्ठ नागरिकांकडून दिला जात आहे.
कणकवली : कोरोनाचा धोका ज्येष्ठांना अधिक असल्याने लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनच त्यांना घरातच थांबावे लागले आहे. त्यामुळे त्यांची विविध प्रकारे गैरसोय झाली आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने ज्येष्ठ नागरिक आता घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची वेळ जनतेने आणू नये. त्यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करावे, असा सल्ला अनेक ज्येष्ठ नागरिकांकडून दिला जात आहे.
कोरोनाचा धोका ज्येष्ठ नागरिकांना अधिक असल्याने लॉकडाऊन सुरू होताच ज्येष्ठ नागरिकांच्या फिरण्यावर बंधने आली होती. त्यामुळे त्यांचा सकाळी आणि संध्याकाळी फिरण्याचा व्यायाम बंद झाला होता.
काहींची मुले परदेशात अथवा मुंबई, पुण्यासारख्या शहरात होती. त्यामुळे घरात वयोवृद्ध पती-पत्नी दोघेच होती. त्यामुळे किराणा, दूध, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू किंवा तातडीची औषधे आणण्यासाठी बाहेर पडताही येत नव्हते. तसेच ऐनवेळी काही त्रास झाला तर डॉक्टरांकडे जाणेही शक्य होत नव्हते.
अशावेळी ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक वेळी शेजाऱ्यांचे सहकार्य मिळतेच असे नाही. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली होती. आता लॉकडाऊन शिथिल झाले तरीही ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडायला सरकारने पूर्णतः मुभा दिलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात घरात राहून ज्येष्ठ नागरिक कंटाळले.
लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यक्तींना योग्य वेळी उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू या काळात झाले. अनेक ठिकाणी उपचारासाठी बाहेर नेण्यासाठी वाहनाची उपलब्धता नव्हती तर काही ठिकाणी डॉक्टर वेळेवर उपलब्ध झाले नाहीत, ही त्यामागची मुख्य कारणे होती. त्यामुळे लॉकडाऊन कधी संपतेय, असे सर्वाना वाटत होते. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनचे संकट नको, असेच ज्येष्ठ नागरिकांना वाटते.
नियम पाळा, कोरोना टाळा
कोरोनाला टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेत नियम पाळले तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार नाही, असे मत ज्येष्ठ व्यक्त करीत आहेत. पुन्हा लॉकडाऊन झाले तर ज्येष्ठ नागरिकांचेच अधिक हाल होतील, असे त्यांना वाटते. त्यामुळे ही वेळ येऊ न देण्यासाठी प्रत्येकानेच काळजी घ्यायला हवी, असे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.
शिस्त पाळायला हवी
कोरोनाने देशावरच मोठे संकट आणले आहे. त्यामुळे नाईलाजाने सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. मात्र, सर्वांनीच शिस्त पाळणे गरजेचे आहे. तरच कोरोनाचा संसर्ग टाळता येईल व प्रभावदेखील कमी होईल आणि संकटातून मुक्ती मिळेल.
पुन्हा लॉकडाऊन नकोच !
लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे देशाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांचे हाल अधिक झाले. काहींच्या घरात दुसरे कुणीच नसल्याने महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणे मुश्किल झाले होते. काही वेळा आजारी असतानाही औषधोपचार मिळत नव्हता. आता थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नको.
- दादा कुडतरकर,
जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, सिंधुुुदुर्ग