‘पुलवामा श्रद्धांजली एक्स्प्रेस’- एसटी चालक संतोष पाटील यांची शहिदांना अनोखी मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 08:51 PM2019-02-26T20:51:01+5:302019-02-26T20:52:37+5:30
काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राखीव पोलीस दलाच्या जवानांना अवघ्या भारतभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण एसटी आगाराचे चालक आणि खारेपाटण गावचे सुपुत्र संतोष पाटील यांनी शहीद जवानांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.
मालवण : काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राखीव पोलीस दलाच्या जवानांना अवघ्या भारतभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण एसटी आगाराचे चालक आणि खारेपाटण गावचे सुपुत्र संतोष पाटील यांनी शहीद जवानांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली. पाटील यांनी आपल्या ताब्यातील एसटी बसच्या चारही बाजूना सीमेवर लढणाऱ्या जवानांची छायाचित्रे लावून व बसमध्ये देशभक्तिपर गाणी लावून श्रद्धांजली वाहिली.
मालवण आगारात संतोष पाटील हे गेली अनेक वर्षे सेवा बजावत आहेत. एसटी आपला संसार असून प्रवासी आपले कुटुंबातील सदस्य आहेत, या भावनेतून त्यांनी हजारो प्रवाशांच्या हृदयावर राज्य गाजविले. शैक्षणिक सहल, प्रासंगिक करार तसेच एसटीच्या जादा फेºया असल्या की प्रवाशांना पाटील यांच्या ताब्यातील एसटीने प्रवास करणे अधिक सुखकर वाटते. एसटी म्हटली की लाल डबा म्हणून नाक मुरडणारे सर्वसाधारण प्रवासी चालक पाटील यांना पाहिल्यावर मात्र त्यांच्या ‘लालपरी’त बसण्यासाठी आतुर होतात.
दरवर्षी, आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एसटी बसमध्ये खास विद्युत रोषणाई, गाण्यांची व्यवस्था करणाºया एसटी चालक संतोष पाटील यांनी यावर्षी मात्र शहिदांना मानवंदना देण्यासाठी अनोख्या पद्धतीने एसटी बस सजविली. पुलवामा येथील आत्मघातकी हल्ल्यात आपले ४४ बांधव धारातीर्थी पडून शहीद झाले. त्याच पार्श्वभूमीवर पाटील यांनी एसटीत सीमेवर लढणाºया जवानांचे जीवन छायाचित्रांच्या माध्यमातून विशद केले. एसटी बसलाही ‘पुलवामा श्रद्धांजली एक्स्प्रेस’ असे नाव दिले. बसवर मालवण एसटी आगाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली असा फलक लावून आपले देशप्रेम अधोरेखित केले. पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल प्रवासी व एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
आंगणेवाडी यात्रोत्सवात चालक पाटील यांच्या ‘फॅन्स’ची संख्या जास्त आहे. पाटील ज्या बसवर चालक म्हणून असतील त्याच बसमधून काही प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे यावर्षी प्रवास करणाºया प्रवाशांना एसटी बसमध्ये भावगीत किंवा हिंदी-मराठी गाण्यांऐवजी देशभक्तीपर गाणी ऐकण्याचा अनुभव घेता येईल. बसच्या आतील बाजूस युद्धभूमीवरची छायाचित्रे असून देशभक्तीपर गाणी ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. चालक पाटील यांना त्यांच्या कुटुंबीयांनी युद्धभूमीवरची छायाचित्रे उपलब्ध करून दिली. यात त्यांना त्यांच्या पत्नीकडून मोलाचे सहकार्य लाभले. चालक पाटील यांनी आगारातील सर्व अधिकारी, चालक, वाहक तसेच कार्यशाळेतील कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे सांगितले.