किल्ल्यातील तलावांचे होणार पुनरूज्जीवन

By admin | Published: April 14, 2017 11:10 PM2017-04-14T23:10:28+5:302017-04-14T23:10:28+5:30

दीपक केसरकर यांची माहिती; किल्ला पर्यटनासाठी ५० कोटी खर्च करणार

Punarjivan will be held in the lake | किल्ल्यातील तलावांचे होणार पुनरूज्जीवन

किल्ल्यातील तलावांचे होणार पुनरूज्जीवन

Next

मालवण : पर्यटन हंगामात दरवर्षी किल्लावासीय तसेच पर्यटकांना पाण्याची समस्या भेडसावते. त्यामुळे पाण्याची समस्या दूर करण्यासाठी किल्ल्यातीलच ऐतिहासिक दोन तलावांचे पुनरूज्जीवन करून मुबलक पाणीसाठा उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती पालकमंत्री तथा अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
पुनरुज्जीवन करण्यात येणाऱ्या तलावातील पाणी शुद्धीकरणासाठी ‘आरओ’ यंत्रणा उभारली
जाईल. किल्ले दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने वर्षभरात ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.
मालवण येथे पालकमंत्री केसरकर यांची सार्वजनिक बांधकाम विभाग, यूएनडीपी, पुरातत्त्व विभाग, महसूल, तसेच किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक पार पडली. शिवराजेश्वर मंदिर सुशोभीकरण, मसुरे भरतगड किल्ला, हडी बेट, आदींचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्यात येणार असून, जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील गावांचा प्रामुख्याने विकास केला जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नितीन वाळके, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, बबन शिंदे, पंकज साधये, सन्मेश परब, महेश मांजरेकर, किसन मांजरेकर, मंगेश सावंत, प्रेरणोत्सवचे गुरू राणे, भाऊ सामंत, ज्योती तोरसकर, दीपक मयेकर यांच्यासह प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, बांधकाम विभागाचे प्रकाश चव्हाण, प्रदीप पाटील, नायब तहसीलदार सुहास खडपकर, पुरातत्त्व विभागाचे राजेश दिवेकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

स्थानिकांसाठी ‘टेंट रिसोर्ट’ची उभारणी
किल्ला विकासासाठी संयुक्त आराखडा बनविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. किल्ल्यात व्यवसाय करणाऱ्या स्थानिक रहिवाशांसाठी ‘टेंट रिसोर्ट’ची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाच्या आवश्यक परवानग्यांची पूर्तता केली जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
पुरातत्त्व विभागावर नाराजी : किल्ल्याची समस्या मांडताना मंगेश सावंत यांनी पुरातत्त्व विभागावर नाराजी व्यक्त केली. तटबंदीवर भलेमोठी पाळे घुसल्याने तटबंदी कमकुवत बनत चालली असून, याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही सावंत यांनी पालकमंत्र्यासमोर केला. यावर पुरातत्त्वच्या दिवेकर यांनी वेळोवेळी तटबंदीवरील पाळे काढण्यात आल्याचे स्पष्ट केले. याला किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.

Web Title: Punarjivan will be held in the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.