१० हजार हेक्टर भातशेती नुकसानीचे पंचनामे, बाधित क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 06:07 PM2020-10-20T18:07:58+5:302020-10-20T18:10:02+5:30

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या भाताला कोंब आले असून ते लावणीयोग्य ...

Punchnama for loss of 10,000 hectares of paddy field, the number of affected areas is likely to increase | १० हजार हेक्टर भातशेती नुकसानीचे पंचनामे, बाधित क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यता

पालकमंत्री उदय सामंत यांनी फळपीक विम्याबाबत जिल्हा बँक कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, आमदार वैभव नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, संजय पडते, संदेश पारकर आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे बाधित क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यतात्या तलाठ्यावर कारवाईचे आदेश : उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या भाताला कोंब आले असून ते लावणीयोग्य झाले आहे. एकंदरीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले असून आजपर्यंत तब्बल १० हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे.

अजून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असून बाधित क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे सांगतानाच खारेपाटण येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी खारेपाटण ते माणगाव याठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला आघाडीप्रमुख जान्हवी सावंत, गटनेते नागेंद्र परब, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, विकास कुडाळकर आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती करण्यात आली आहे. भातशेती ही चांगली झाली होती. मात्र, जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. पावसाने काही ठिकाणी भातशेती आडवी पडली असून त्या भाताला कोंब आले आहेत. तसेच कापलेले भात भिजून कुजून गेले आहे. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आपण जिल्हा प्रशासनाला या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

पंचनामे करीत असताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी याचा विचार करावा. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पंचनामे करावेत. सध्याच्या आकडेवारीनुसार प्राथमिक नुकसान १० हजार हेक्टरचे झाल्याचे दिसते. प्राथमिक नुकसान जरी इतके असले तरी त्यामध्ये आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तरी त्यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे तयार करावेत.

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणे ही आमची भूमिका आहे. ज्याठिकाणी पंचनाम्यांविषयी लोकांच्या तक्रारी असतील तेथे अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. गेल्या वर्षी पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई ज्यांना अद्याप प्राप्त झालेली नाही, त्यांना येत्या दोन दिवसात सर्व रक्कम देण्यात यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या असल्याची माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली.

२५ केंद्रांवर ५० हजार क्विंटल भात खरेदी

यंदाच्या वर्षी भात खरेदीसाठी २५ केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात किमान ५० हजार क्विंटल भाताची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी नामदेव गवळी यांनी यावेळी दिली. भात खरेदी ही १ हजार ८६८ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात येणार आहे.

तसेच यावर बोनसही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करावी अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिल्या. तसेच बोनसचा प्रस्ताव व खरेदी मंजुरीसाठीचा प्रस्ताव तातडीने पाठवून तो मंजूर करून घ्यावा. मदत लागल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशा सूचनाही केल्या.

सर्व पंचनामे तातडीने करा

आजपर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार १० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शिवाय अजून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगत फक्त भाताचेच नाही तर नाचणी, आंबा, काजू यासह सर्व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत. सर्व ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांची मंगळवारी बैठक घेऊन तातडीने पंचनामे करण्याविषयाच्या सूचना तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी द्याव्यात, असे आदेश दिले.

 

Web Title: Punchnama for loss of 10,000 hectares of paddy field, the number of affected areas is likely to increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.