पुण्याचे पथक केरमध्ये ; नमुने तपासले
By admin | Published: January 25, 2016 11:28 PM2016-01-25T23:28:33+5:302016-01-25T23:28:33+5:30
योगेश साळे यांची माहिती : जनतेने घाबरुन जाऊन नये ; तातडीने उपचार घ्या
सिंधुुदुर्गनगरी : दोडामार्ग तालुक्यातील केर गावातील दोन रूग्णांना कॅसनूर फॉरेस्ट डिसीज (माकडताप) या प्रकारचा ताप आल्याने त्यांना गोवा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका रूग्णाला या प्रकारचा ताप असल्याचा अहवाल गोव्यातील रूग्णालयाने जिल्हा आरोग्य यंत्रणेला पाठविला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेत पुणे येथील एका पथकाने केर येथील १७ संशयीतांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून त्यांचा अहवाल पुणे येथुनच प्राप्त होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांंनी सांगितले.
सध्या केर गावात कॅसनूर फॉरेस्ट डिसीज या आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत. हा विषाणूजन्य आजार असून गोचीड चावल्यामुळे हा आजार बळावतो. त्यामध्ये उंदीर, माकडे व पाळीव प्राणी यांचा समावेश आहे. माणसाला हा आजार गोचीड चावल्यामुळे तसेच जंतुसंसर्ग प्राण्यांच्या सहवासात राहिल्यामुळे किंवा आजारी मृत माकडांच्या सानिध्यात राहिल्यामुळे होतो.
केर गावातील दोघांना या प्रकारचा ताप आल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले होते. त्यांचे नमुने घेतले असता त्यातील एक रूग्णामध्ये माकडतापाचे विषाणू असल्याचे आढळून आले. तर एका रूग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे पुणे येथील एका पथकाला या या गावात पाचारण करून १७ संशयितांचे रक्त नमुने घेण्यात आले. यावर तपासणी करून पुणे येथुन अहवाल प्राप्त होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी यासंदर्भात बैठक घेऊन आरोग्य विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के.जोशी यांनी सर्व विभागांना जबाबदाऱ्या देत जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत.
झेंडावंदनाचे कार्यक्रम झाल्यावर पालकमंत्री दीपक केसरकर केर गावची भेट घेणार असून आरोग्य यंत्रणेला पूर्णपणे सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. या गावात आढळणाऱ्या रूग्णांवर येथेच उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे. जनतेने घाबरून न जाता ताप आल्यास तातडीने नजीकच्या शासकीय दवाखान्यात उपचार घ्यावेत, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. (प्रतिनिधी)