शेतकऱ्यांच्या नावावर बियाणे खरेदी करून फसवणूक
By admin | Published: June 10, 2015 11:25 PM2015-06-10T23:25:22+5:302015-06-11T00:24:24+5:30
सतीश सावंत : स्थायी समिती सभेत आरोप
ओरोस : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जिल्ह्यात मोफत बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावर मोफत बियाणे खरेदी करून दुसऱ्या शेतकऱ्यांना विकण्यात येत असल्याचा आरोप स्थायी समिती सभेत सतीश सावंत यांनी केला.जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, रणजित देसाई, अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर, स्नेहलता चोरगे, सतीश सावंत, वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, रेवती राणे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र, काही ठिकाणी संबंधित विभागच शेतकऱ्यांच्या नावावर मोफत बियाणे खरेदी करून अन्य शेतकऱ्यांना विकत असल्याचा आरोप सदस्य सतीश सावंत यांनी सभेत उपस्थित केला, तर संबंधित विभागाची चौकशीची मागणी केली. तसेच यापुढे ज्याठिकाणी मोफत बियाण्यांचे वाटप होत असेल त्याठिकाणी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन बियाण्यांचे वाटप करावे, असे आवाहन सतीश सावंत यांनी स्थायी समिती सभेत केले.
या सभेत विद्युत प्रकरणाबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. त्याचप्रमाणे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी १६ मेपर्यंत जिल्ह्यातील सर्व कृषी पंपांना वीज जोडणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सद्यस्थितीत एकाही कृषीपंपाला वीज जोडणी मिळालेली नाही. याबाबत सभागृहात नाराजी व्यक्त करत कृषी पंपांना त्वरित वीज जोडणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिले.
जिल्ह्यात ५५ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी सुमारे २२ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र शासनाकडून अनुदानच उपलब्ध न झाल्याने काही कामे शिल्लक राहिली आहेत. त्यामुळे सुमारे २२ कोटींची कामे पूर्ण केलेले ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडल्याची माहितीही सभेत देण्यात आली. (वार्ताहर)
जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडली
याबाबत बुधवारी सभागृहात आरोग्य विभागावर नाराजीचा सूर उमटला. जिल्ह्यात कुठेही आरोग्य सेवा उत्तमरित्या मिळत नाही. तसेच संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात, अशी माहिती सभेत सर्व सदस्यांनी उपस्थित केली असता जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य उपसंचालकांना २२ जून रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्षांनी केल्या आहेत.