गणेशोत्सवात पूजनासाठी पुरोहितांची तारांबळ
By admin | Published: August 28, 2014 09:21 PM2014-08-28T21:21:14+5:302014-08-28T22:23:04+5:30
समस्या : भिक्षुकी करणाऱ्यांची संख्या घटतेय
मिलिंद पारकर - कणकवली -गणेशोत्सवात गणेश पूजनासाठी पुरोहितांची आवश्यकता असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच वेळी घरोघरी होणाऱ्या गणेश पूजनासाठी जाताना पुरोहितांची तारांबळ उडते. दिवसेंदिवस पौरोहित्य करणाऱ्यांची संख्या घटत चालली असल्याने पहाटेपासून रात्रीपर्यंत पहिल्या दिवसाचे गणेशपूजन करण्याची वेळ येते.
गणेश पूजनाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरच्या गणपतीची पूजा व्हावी यासाठी प्रत्येकजण आधीपासून गावातील भटजींना ‘आमच्याकडे आधी’ असे सांगून ठेवतो. तरीही सर्वांकडेच गणेशपूजन करायचे असल्याने पुरोहितांची दमछाक होते. प्रत्येकजण आपल्याकडे पुरोहितांना घेऊन जाण्यासाठी टपून असतो. यातून भटजींची पळवापळवी होते. प्रथेनुसार प्रत्येक ठिकाणी गावच्या ब्राम्हणांकडून गणेशपूजन केले जाते. मात्र, गावातील पुरोहितांना गणेश पूजनासाठी पहाटेपासून पूजेला सुरूवात करावी लागते आणि सायंकाळपर्यंत घरोघर फिरून गणेशपूजन पार पाडावे लागते.
जिल्ह्यात वे. मू. बाळकृष्ण कापडी वेदपाठशाळा, वागदे, वे.मू.मुरवणे गुरूजी वेदपाठशाळा, वायंगणी, दाभोली येथील पूर्णानंद स्वामी मठ, वासुदेवानंद सरस्वती वेदपाठशाळा, साळगांव, टेंबेस्वामी पाठशाळा माणगांव, सावंतवाडी संस्कृत वेद पाठ शाळा या जिल्ह्यातील वेदपाठशाळांमधून एकूण ६० ते ७० विद्यार्थी भिक्षुकीचे शिक्षण घेतात.
गणेश पूजनासाठी ब्राम्हणांची आयात
गणेशोत्सवात पूजनासाठी ब्राम्हणांची मोठी कमतरता जाणवते. पहाटे अगदी ३ वाजल्यापासून पूजा सुरू करतात. तेव्हा कुठे सायंकाळपर्यंत गावातील पूजा आटोपतात.
जिल्ह्यात सगळीकडेच ही कमतरता भरून काढण्यासाठी मग जिल्ह्याबाहेरून पुरोहित मागवले जातात.
ग्रामपुरोहिताच्या हाताखाली हे पुरोहित काम करतात. नृसिंहवाडी आदी भागातून पुरोहित जिल्ह्यात दाखल होतात.
भिक्षुकीपासून दूर
ब्राम्हण समाजातील नव्या पिढीतील मुले पारंपरिक भिक्षुकीचे शिक्षण घेण्यापेक्षा आता शाळा, कॉलेज करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे भिक्षुकी करणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे. भिक्षुकीमधून उदरनिर्वाह व्यवस्थित होऊ शकतो. परंतु भिक्षुकी करणाऱ्या मुलांकडे समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. तसेच पौरोहित्य करणाऱ्याला राजाश्रय मिळत नाही. विवाहासाठी मुलींकडून भिक्षुकी करणाऱ्या मुलांना पसंती दिली जात नाही.
ब्राम्हण कुटुंबातील मुलांचे भिक्षुकी करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. विवाहप्रसंगी अशा मुलांना मुलींकडून पसंती मिळत नाही. पौरोहित्याला राजाश्रय मिळत नाही. धार्मिकतेकडून भौतिकतेकडे ओढ यामुळे तरूण पिढी भिक्षुकीपासून दुरावत आहे.
- बाळकृष्ण कापडे, वे. मूर्ती, वागदे