परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षणाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:19 PM2019-05-28T12:19:36+5:302019-05-28T12:21:32+5:30
कुक्कुटपालनासारख्या व्यवसायातून उपजीविकेची साधने विकसित करणे सहज शक्य आहे. त्यासाठी पंचायत समितीतर्फे उमेदमार्फत संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन प्रभारी गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी कोकिसरे येथे केले.
वैभववाडी : स्वावलंबनाचा दृष्टीकोन ठेवून महिलांनी ह्यउमेदह्ण अभियानाच्या माध्यमातून छोटे-छोटे व्यवसाय सुरू करावेत. कुक्कुटपालनासारख्या व्यवसायातून उपजीविकेची साधने विकसित करणे सहज शक्य आहे. त्यासाठी पंचायत समितीतर्फे उमेदमार्फत संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन प्रभारी गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी कोकिसरे येथे केले.
कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग, जिल्हा नियोजन समिती आणि मानव विकास कार्यक्रम तालुका स्पेसिफिक योजनेंतर्गत तालुक्यातील कुक्कुटपालन प्रशिक्षणाचा समारोप कोकिसरेत प्रभारी गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक आण्णा बुरंगे, अरुण काबंळे, रिना कुरुळुपे, समुदाय कृषी व्यवस्थापक अनुष्का राठोड, प्रणव सपकाळ आदी उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाल्या की, राज्यातील गरिबी निर्मूलनासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू करून उमेदच्या माध्यमातून महिलांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचा व्यवसायातून आर्थिक विकास झालेला दिसला पाहिजे. स्वत:च्या पायावर उभे राहून कौटुंबीक गरजा भागविण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी गरज लागेल तेव्हा उमेदचे सहकार्य घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
तालुक्यात सडुरे-शिराळे, सांगुळवाडी, नावळे, मांगवली आणि कोकिसरे या पाच गावांमध्ये ह्यउमेदह्ण अंतर्गत समूहातील महिलांना परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या पाच गावातील डोंगरी भागातील १५० महिलांनी प्रशिक्षण घेतले.
पंचेचाळीस दिवस प्रशिक्षण कार्यक्रम
प्रशिक्षणार्थी महिलांना कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गचे डॉ. केशव देसाई, प्राजक्ता सावंत यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी पक्ष्यांचे संगोपन, आजार, घ्यावयाची काळजी, विक्री व्यवस्थापन आदी बाबींची विस्तृत माहिती दिली. तालुक्यात पंचेचाळीस दिवस हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होता.