नगरपंचायत परिसरात ठेकेदाराला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:14 PM2020-09-28T12:14:36+5:302020-09-28T12:15:58+5:30
वैभववाडी येथील नगरपंचायत कार्यालय परिसरात मजूर संस्था असलेल्या एका ठेकेदाराला नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यासह त्यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की केली. जवळच असलेल्या अन्य कार्यकर्त्यांनी ठेकेदाराला सोडवून घेतले. त्यामुळे तो बचावला. या मारहाणीचे कारण गुलदस्त्यात असून सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकाराची शहरात चर्चा सुरू होती.
वैभववाडी : येथील नगरपंचायत कार्यालय परिसरात मजूर संस्था असलेल्या एका ठेकेदाराला नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यासह त्यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की केली. जवळच असलेल्या अन्य कार्यकर्त्यांनी ठेकेदाराला सोडवून घेतले. त्यामुळे तो बचावला. या मारहाणीचे कारण गुलदस्त्यात असून सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकाराची शहरात चर्चा सुरू होती.
नगरपंचायतीमध्ये आढावा सभेचे आयोजन केले होते. सभा संपल्यानंतर नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नगरपंचायतीच्या मुख्य दरवाजानजीक थांबून काही विषयांवर चर्चा करीत होते. ही चर्चा सुरू असताना एक माजी नगराध्यक्ष आणि त्या ठेकेदारामध्ये काही मुद्यांवरून वाद निर्माण झाले. आपल्यामुळेच नगरपंचायत निवडणूक जिंकता आली, अशा अविभार्वात वावरणाऱ्या या ठेकेदाराने त्या पदाधिकाऱ्यांवर आवाज चढविला.
त्यामुळे त्या पदाधिकाऱ्याच्या रागाचा पारा चढला. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या काही समर्थकांनी त्या ठेकेदाराला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. एकाने तर त्याच्या कानशिलात लगावल्याची चर्चा आहे. हा प्रकार सुरू असतानाच काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराला सोडवून घेतले. मात्र, त्या पदाधिकाऱ्यांचे समर्थक त्याला शिवीगाळ करीत होते.
नगरपंचायत परिसरात मारामारी झाल्याची चर्चा अवघ्या काही मिनिटांत वैभववाडी शहरात पोहोचली. शहरातील अनेकांनी नगरपंचायतीकडे धाव घेतली. हा प्रकार पाहण्यासाठी काहींनी गर्दी केली होती. परंतु या धक्काबुक्कीचे नेमके कारण काय हे समजू शकलेले नाही. या प्रकाराची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.