‘त्या’ ठेकेदारांना काळ्या यादीत टाका
By Admin | Published: April 7, 2017 10:57 PM2017-04-07T22:57:35+5:302017-04-07T22:57:35+5:30
भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे बांधकामला निवेदन : रस्त्यांची कामे दर्जेदार करुन घ्या अन्यथा आंदोलन करणार
कणकवली : सिंधुदुर्गातील काही ठेकेदार हे मजूर सहकारी संस्थांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करीत आहेत. मात्र, ही कामे निकृष्ट होत असल्याने त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी. तसेच काम सुरू असलेल्या प्रत्येक ठिकाणी बांधकाम खात्याची तज्ज्ञ मंडळी असावीत अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी केली. याबाबतचे निवेदनही त्यांनी बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता बासुदकर यांना दिले.
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शिशीर परुळेकर, महिला तालुकाध्यक्षा गीतांजली कामत, युवा मोर्चा उपाध्यक्ष पप्पू पुजारे, दीपक दळवी, समर्थ राणे, प्रितम मोर्ये, प्रवीण पाटील आदींनी बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता बासुदकर यांची भेट घेतली .
तसेच निकृष्ट कामांबाबत जाब विचारला. तालुक्यात सातत्याने निकृष्ट कामे होतात. गतवर्षी झालेल्या डांबरीकरणानंतर पुन्हा त्याच रस्त्यावर खड्डे पडतात. यात जनतेचा पैसा वाया जातो. असे प्रकार रोखण्यासाठी निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे अशी आग्रही मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.
कणकवली तालुक्यात अनेक रस्त्याचीे कामे निकृष्ट झाली आहेत. ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर निकृष्ट काम काढून टाकून तेथे पुन्हा नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. तालुक्यात अशी वारंवार आंदोलने होऊ नयेत यासाठी बांधकामच्या अधिकाऱ्यांनीच कामावर आणि गुणवत्तेवर नियंत्रण ठेवायला हवे अशी मागणी यावेळी परुळेकर यांनी केली. बांधकामच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या कामावर बारकाईने लक्ष ठेऊन दर्जेदार काम करून घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
कणकवलीसह जिल्ह्यात सुरू असलेल्या निकृष्ट कामांबाबत बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, तसेच बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडेही तक्रार केली असल्याचेही भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यात भाजपचे सरकार असल्याने रस्ते व इतर विकास कामांसाठी मोठया प्रमाणात निधी आला आहे. या निधीचा निकृष्ट कामे करून गैरवापर होत असेल, तर भाजप कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. तालुक्यात कुठेही निकृष्ट कामे सुरू असतील तर ती तातडीने थांबविली जातील तसेच बांधकामच्या अधिकाऱ्यांनाही शांत बसू देणार नाही असा इशारा शिशीर परुळेकर यांनी यावेळी
दिला. (प्रतिनिधी)