प्र. ल. मयेकर स्मृती नाट्यमहोत्सव

By admin | Published: March 14, 2016 08:50 PM2016-03-14T20:50:48+5:302016-03-14T20:50:48+5:30

नाट्यपरिषदेचा पुढाकार : रत्नागिरी शाखेच्या बैठकीत निर्णय; १३ एप्रिलपासून होणार प्रारंभ

Q. L Mayekar Smriti Natya Mahotsav | प्र. ल. मयेकर स्मृती नाट्यमहोत्सव

प्र. ल. मयेकर स्मृती नाट्यमहोत्सव

Next

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात १३ ते १५ एप्रिल या कालावधीत प्रसिध्द नाटककार प्र. ल. मयेकर स्मृती नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती परिषद नियामक मंडळाचे सदस्य आमदार उदय सामंत यांनी रविवारी पत्रकारपरिषदेत दिली.
नाट्यपरिषदेच्या रत्नागिरी शाखेची बैठक रविवारी झाली. या बैठकीत नाट्यमहोत्सव आयोजनाबरोबरच अनेक निर्णय घेण्यात आले. याबाबतची माहिती आमदार सामंत यांनी दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत नाट्यपरिषदेचे पदाधिकारी दादा वणजु, मनोहर जोशी, सुहास भोळे, दळी, अनिल दांडेकर आदी मान्यवर उपस्थित
होते.
यावेळी बोलताना आमदार सामंत म्हणाले, प्र. ल. मयेकर आज आपल्यात नाहीत. त्यांनी लिहिलेली अनेक नाटके मराठी रंगभूमीवर गाजली. राज्यात त्यांच्या नाटकांचा एक चाहतावर्ग आहे. नाट्यक्षेत्रातील त्यांचे कार्य मोठे आहे. नाट्यपरिषदेची रत्नागिरी शाखाही त्यांच्याच पुढाकाराने सुरू झाली होती.
त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नाट्यमहोत्सवाचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आले आहे. या तीन दिवस चालणाऱ्या नाट्य महोत्सवात सध्या रंगभूमीवर गाजत असलेली तीन नाटके सादर होणार आहेत.
या महोत्सवात प्र. ल. मयेकर यांचे नाटकही सादर व्हावे, असा परिषदेचा प्रयत्न आहे. भद्रकाली प्रॉडक्शनने मयेकर यांचे पांडगो इलोरे बा इलो या नाटकाचे व्यावसायिक रंगभूमीवर २५पेक्षा अधिक प्रयोग केले आहेत. सध्या हे नाटक रंगभूमीवर नाही. तरीही भद्रकाली प्रॉडक्शनचे प्रसाद कांबळी यांना आपण हे नाटक महोत्सवात सादर करण्याची विनंती करणार आहोत, असेही सामंत म्हणाले.
परिषद शाखेच्या सभेत शाखेचे सभासद वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या रत्नागिरी शाखेचे ४५० सदस्य आहेत. तसेच रत्नागिरी शाखेअंतर्गत येणाऱ्या अनेक हौशी नाट्य संस्थांनाही एकत्र आणले जाणार आहे. येत्या महिनाभरात या सर्व संस्थांची एकत्रित बैठक आयोजित केली जाणार आहे. (प्रतिनिधी)


दमडीही नाही...
रत्नागिरीत चित्रीकरणासाठी आलेल्या काही निर्मात्यांनी स्थानिक कलाकारांनाही त्यात सामावून घेतले. मात्र, त्या स्थानिक कलाकारांना मानधनाची दमडीही दिली नाही, अशी त्यांची तक्रार नाट्यपरिषद शाखेकडे आली आहे. याचा जाब संबंधित निर्मात्यांना विचारला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Q. L Mayekar Smriti Natya Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.