मार्काएवढी गुणवत्ता हवीच
By admin | Published: June 8, 2015 10:18 PM2015-06-08T22:18:24+5:302015-06-09T00:10:52+5:30
पाल्याची आवड, कल ओळखा : पाध्ये
आपल्या पाल्यामध्ये मार्काएवढी गुणवत्ता आहे का? याची खात्री पालकांनी करणे गरजेचे आहे. अनेकवेळा प्रवेशावेळी पाल्यावर बंधने लादली जातात. मुलांची आवड निवड लक्षात न घेता प्रवेश घेतला जातो. मात्र, आवड किंवा कल नसल्यामुळे पाल्य पालकांच्या दबावाखाली येतात. दुहेरी मानसिक स्थितीत मुले भरडली जातात. त्यामुळे आर्थिक त्याचबरोबर मानसिक नुकसानास सामोरे जावे लागते. त्यापेक्षा प्रवेशापूर्वी पालकांनी तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेतले व आपल्या मुलाची गुणवत्ता ओळखून त्याच्या आवडीनुसार अभ्यासक्रमाची निवड केली तर मुलं आपल्या आवडीच्या क्षेत्रात नक्कीच यश मिळवू शकतात. एकूणच त्यामुळे कुटुंब डिस्टर्ब होणार नाहीत, पाल्यास स्पर्धेचा घोडा कदापि बनवू नये. असे थेट संवाद साधताना पुरषोत्तम पाध्ये यांनी सांगितले.
करिअर घडविणे महत्त्वाचे असले तरी अनेकवेळा गोंधळात निवड चुकते. पालक आपल्या इच्छा मुलांवर लादत असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:च्या आवडीला वाव मिळत नाही. व्दिधा मन:स्थितीत पालक व मुले भरडली जातात. त्यामुळे आर्थिक व मानसिक नुकसान होते. त्यापेक्षा तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेऊन मुलांच्या गुणवत्तेनुसार आवडीचे क्षेत्र निवडवावे. सध्या कार्पोरेट जगताबरोबर डॉक्टर, इंजिनिअर, चार्टर्ड अकौंटंट, वकील तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्याकडेही विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे. रत्नागिरीमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनवर्ग उपलब्ध आहेत. परंतु एमबीएसाठी चांगलं कॉलेज होणे आवश्यक आहे. याशिवाय आयसीडब्ल्यू, सीए, सीएससारख्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्र होणे गरजेचे आहे. त्यासाठी तज्ज्ञ मंडळींकडून पाठपुरावा होणे आवश्यक आहे, असे मत ‘उज्ज्वला क्लासेस प्रा. लि.’च्या पुरूषोत्तम पाध्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
वास्तविक परिपूर्ण शिक्षण कोठेच मिळत नाही. अनेक शिक्षण संस्था कार्यरत असून, त्यांनी विद्यार्थीसंख्येवर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा आपण विद्यार्थ्यांना काय शिकवतो, याला प्राधान्य दिले पाहिजे. मुलांच्या मार्काएवढी गुणवत्ता आहे का, याची खात्री करूनच क्षेत्र निवडीला प्राधान्य द्यावे.
अनेकवेळा हुशार विद्यार्थी केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे शिक्षण अर्धवट सोडतात. अशा विद्यार्थ्यांनी कमकुवत न बनता स्वत:ची गुणवत्ता सिध्द करावी. पालकांनी जागरूक राहून मुलाला झेपेल त्या क्षेत्राची निवड करावी. जिल्ह्यात असलेल्या महाविद्यालयांची संख्या व शिकविले जाणारे अभ्यासक्रम लक्षात घेता, व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रम सुरू होणे गरजेचे आहे. जिल्ह्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार केला असता आयसीडब्ल्यू, सी. ए., सी. एस. परीक्षांसाठी परीक्षा केंद्र रत्नागिरीत होणे गरजेचे आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे श्रम, पैसा व वेळ वाचेल.
चार वर्षांपूर्वी ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल विज्ञान किंवा अभियंता शाखेकडे असायचा. मात्र, खर्चिक शिक्षणाबरोबरच कॉर्पोरेट सेक्शनमुळे वाणिज्य शाखेकडे वळणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रत्नागिरीतही आता पुण्या, मुंबईच्या तुलनेत कमी खर्चात चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत आहे.
वाणिज्य शाखेकडे विद्यार्थी अधिक वळत आहे. कोकण बोर्ड झाल्यापासून वाणिज्य विभागात बोर्डात प्रथम येण्याचा मान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मिळवला आहे. यावर्षी तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. रत्नागिरी व चिपळूणवगळता वाणिज्य विभागातील मॅथेमेटिक्सचे वर्ग सुरू होणे गरजेचे आहे. हुशार विद्यार्थ्यांसाठी विशेष मेहनत घेतली तर नक्कीच त्याचा फायदा होतो. मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांसाठी विशेष क्लास लावला, तर त्याचाही परिणाम गुणवत्तेमध्ये दिसून येतो. क वर्गातील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी मात्र भरपूर व शंभर टक्के प्रयत्न करणे गरजेचे आहे. संस्थेने निकालाची परंपरा राखल्यामुळे रत्नागिरी शहर व परिसरातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. वाणिज्य शाखेतील सर्वाधिक विद्यार्थी अभ्यासवर्गात असल्याचे पाध्ये यांनी सांगितले.
प्रत्येक संस्थेने विद्यार्थी घडविणे हाच मुख्य उद्देश्य आहे. त्यानंतर व्यवसाय किंवा फॅमिली कोचिंग क्लासेस असल्याचे ध्यानात ठेवावे. आपल्या इच्छा, आकांक्षांसाठी पाल्यास ‘स्पर्धेचा घोडा’ बनवू नये. उच्च करिअरच्या स्वप्नासाठी पाल्यावर ओझे लादण्यापेक्षा त्याला कामातून मिळणारा आनंद, समाधान या गोष्टीदेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेत विविध अभ्यासवर्गांची संख्या वाढली आहे. हे कोठेतरी थांबणे गरजेचे आहे.
तळमळीने शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. मुलांना बेसिक माहिती असणे आवश्यक आहे. मात्र, नेमके त्याकडेच दुर्लक्ष होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया नेमका कच्चा राहतो. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या अध्यापकांसाठी दरवर्षी प्रशिक्षणाबरोबर परीक्षा पध्दतीचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून शिक्षकही रिफ्रेश होतील. त्याचा परिणाम अध्यापन पध्दतीवर दिसून येईल.
पालकांनी स्पर्धेच्या जगामध्ये मुलांना भौतिक सुखसुविधा उपलब्ध करून देत असताना आपली मुले संस्कारक्षम करणेही तितकेच गरजेचे आहे. व्यवहारज्ञानाची माहितीही त्यांना देणे गरजेचे आहे. इंटरनेटमुळे अवघे जग जवळ आले आहे. पाहिजे ती माहिती तत्काळ उपलब्ध होते. परंतु अनावश्यक माहिती मिळवण्याच्या नादात विकृती वाढली आहे. त्यामुळे पालकांची नजर पाल्यावर सातत्याने असणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध झाली की, त्याचे मूल्य कळत नाही. परंतु ती गोष्ट मिळवण्यासाठी जेव्हा कष्ट करावे, लागतात, त्यावेळी त्याचे मूल्य उमगते.
रत्नागिरी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधा लक्षात घेता, व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे. विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळत असल्याने संस्था व त्याची मान्यता याची माहिती घेणे गरजेचे आहे. नाहक संस्थेला दोष देण्यापेक्षा पालकांनी स्वत:च जागरूक असण्याची आवश्यकता आहे. मुंबई, पुण्याकडे शिक्षणासाठी जात असताना आपल्याकडे उपलब्ध असलेले अभ्यासक्रम, संस्थांची माहिती घेणे गरजेचे आहे. चुकीचा अभ्यासक्रम निवडण्यापेक्षा योग्य अभ्यासक्रम निवडून त्यामध्ये समाधान मिळवावे.
-मेहरून नाकाडे