शोभा वाढली पण दर्जाचा प्रश्न अनुत्तरीतच
By admin | Published: February 19, 2016 12:05 AM2016-02-19T00:05:31+5:302016-02-19T00:16:46+5:30
कुटीर रूग्णालय दुरूस्तीची अवस्था : निधी मंजूर असूनही मुहूर्त सापडेना, बाह्य सजावटीपेक्षा अंतर्गत सुधारणेची गरज
प्रसन्न राणे -- सावंतवाडी येथील संस्थानकाळापासून असलेल्या कुटीर रूग्णालयाच्या इमारतीसाठी शासनाकडून मंजूर झालेल्या दीड कोटी रूपयांच्या निधीचा अद्यापही थांगपत्ता नसून अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या इमारतीचे काम सुरू होणार तरी केव्हा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे कुटीर रूग्णालयात डागडुजीची गरज असतानाही रूग्णालयाच्या बाहेरील सुशोभिकरणाचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. दर्जा सुधारण्यापेक्षा सुशोभिकरणावर भर देणारे नेमके काय साधणार आहेत? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांशी रूग्ण कुटीर रूग्णालयाचा लाभ घेतात. अनेक गावांमधून शेकडो रूग्ण या रूग्णालयात उपचारासाठी येत जात असतात. यावेळी त्या रूग्णांना अनेक समस्या भेडसावत असतात. प्रसुतीगृहातील गैरसोय, बेडची कमतरता, विद्युत पुरवठा वारंवार खंडीत, पिण्याच्या पाण्याची गैरव्यवस्था, पावसाळ्यात छप्पर दुरूस्ती करूनही गळतीची समस्या भेडसावत आहे. अनेक समस्यांना दररोज नवनवीन रूग्णांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, तरीही रूग्णांच्या जिवाशी खेळ करीत दरवर्षी मलमपट्टी शिवाय काहीही करण्यात येत नाही.
याचबरोबर या रूग्णालयातील शवागृहही मृतावस्थेत आहे. सुरूवातीपासूनच शवागृहे नादुरूस्त झाल्याने नवीन बांधण्यात आले होते. मात्र, दुसरेही शवागृह लगेचच बंद पडल्यानंतर यांच्या दुरूस्तीकडे पुर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे मध्यंतराच्या काळात सावंतवाडीतीलच दोघांचे मृतदेह ओरोस येथे ठेवण्यात आले होते.
रूग्णालयातील रूग्णांसाठी असलेली विहिरही बंद करण्यात आली. यामुळे नळाच्या पाण्याचा वापर रूग्णांना करावा लागत आहे. तेही वेळापत्रकानुसार यामुळे रूग्णालयाची स्वतंत्र एक विहीर अथवा बोअरवेल असणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यदृष्ट्या स्वच्छ पाणी त्यांना उपलब्ध होऊ शकते. रूग्णालयात असंख्य समस्या असतानाही या समस्यांकडे दुर्लक्ष करीत बांधकाम विभागाने रूग्णालयाच्या बाहेरील कठड्याचे काम हाती घेतले. ही अत्यंत निंदनीय अवस्था असून रूग्णांच्या होणाऱ्या परवडीकडे सर्वांनीच डोळे बंद केले आहे. याबाबत कोणच जाब विचारत नसून सर्वांनीच बघ्याची भूमिका घेतली आहे.
कुटीर रूग्णालयाच्या इमारत दुरूस्तीसाठी शासनाकडून दीड कोटीचा निधी मंजूर होऊन कित्येक महिने झाले. मात्र, तरीही रूग्णांच्या सेवेकडे दुर्लक्ष करीत नुसती शोभा वाढविण्याचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. यामुळे दररोज होण्याच्या परवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
इमारतीला गरज शवविच्छेदनाची
रूग्णालयातील सर्वच इमारतीची दुरवस्था झाली आहे. खिडक्या, भिंती, दारांसह छप्पराचे
साहित्यही निकृष्ट बनले आहे. त्यामुळे या विभागाचेच शवविच्छेदन करून त्याची दुरूस्ती करण्याची नितांत गरज आहे. याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचे छप्परही जीर्ण झाले आहे. यामुळे या सर्व बाबींकडे जलदगतीने लक्ष देणे आवश्यक आहे.