अतिरिक्त शिक्षणसेवकांचा प्रश्न धसास लावणार
By admin | Published: April 9, 2017 05:20 PM2017-04-09T17:20:02+5:302017-04-09T17:20:02+5:30
वेणूनाथ कडू यांचे आश्वासन, सिंधुदुर्ग दौऱ्यात शिक्षकांशी साधला संवाद
आॅनलाईन लोकमत
कुडाळ, दि. ९ : सिंधुदुर्गातील त्या १४ शिक्षणसेवकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रश्न धसास लावणार, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी रविवारी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या कडू यांनी ओरोस येथे अतिरिक्त शिक्षक, शिक्षणसेवक, सर्व समस्याग्रस्त शिक्षकांसोबत बैठक घेतली, त्यात ते बोलत होते. निवडणूक निकालानंतर कडू यांनी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समायोजन प्रक्रियेसंदर्भात शिक्षकांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र माणगावकर, सचिव सलिम तकीलदार आदींनीही मार्गदर्शन केले. कडू म्हणाले, एस. एम. हायस्कूलच्या शिक्षिका नयना कृष्णा केसरकर यांना त्यांचा संवर्ग तत्काळ मिळवून न दिल्यास शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षणसंस्थेवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली. याशिवाय २४ जानेवारी २0१७ च्या महाराष्ट्र शासनाच्या सेवाज्येष्ठता निर्णयानुसार यादी तयार करण्याचे आदेश तत्काळ संस्थाचालकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी द्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली.
निवडणूक निकालानंतर प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यात आलेल्या कडू यांनी सांगितले, की मी संघटनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी पराभवाने खचून जाणारा कार्यकर्ता नाही. शिक्षक परिषदेचा कार्यकर्ता एका आमदाराच्या तोडीचा असला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. माझ्या पराभवानंतर तब्बल दीड ते दोन हजार शिक्षक-शिक्षिकांनी मतदान केंद्राबाहेर ढाळलेले अश्रू फुकट जाउ देणार नाही. मेहनतीने काम करुन पुन्हा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा झेंडा कोकण मतदार संघावर फडकविणारच, असा निर्धार वेणूनाथ कडू यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कडू यांनी निवडणुकीतील किस्से सांगून शिक्षक कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
१0 एप्रिल रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना भेटणार
जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या समस्यासंदर्भात सोमवार, दि. १0 एप्रिल रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी रंगराव काळे यांची भेट घेणार असून जिल्ह्यातील सर्व शिक्षक, संस्थाचालक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्ह्याध्यक्ष राजेंद्र माणगावकर यांनी केले.
शिक्षणमंत्र्यांसमावेत १८ रोजी बैठक
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निवासस्थानी सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षकांच्यासमवेत १८ एप्रिल रोजी बैैठक होणार आहे, अशी माहितीही कडू यांनी यावेळी दिली.