नगरपंचायत क्षेत्रातील कुळांचा प्रश्न ‘जैसे थे’

By admin | Published: June 19, 2015 11:16 PM2015-06-19T23:16:07+5:302015-06-20T00:34:13+5:30

ही उद्भवलेली नवीन समस्या शासनासमोर मांडून लवकरच त्याबाबत योग्य निर्णय देऊ, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे.

The question of the members of the Nagar Panchayat area was like ' | नगरपंचायत क्षेत्रातील कुळांचा प्रश्न ‘जैसे थे’

नगरपंचायत क्षेत्रातील कुळांचा प्रश्न ‘जैसे थे’

Next

रत्नागिरी : शासनाने बेदखल कुळांच्या अनेक वर्षांच्या समस्या संपवण्याच्या दृष्टीने मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ अंतर्गत सुधारणा अधिनियम लागू करून त्यांना मालकी हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला असला तरी जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींच्या क्षेत्रातील कुळांना मात्र या कायद्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
बेदखल कुळांना तसेच कुळवहिवाटदारांना आपला कूळहक्क शाबूत करण्यात यावा, यासाठी शासनाने मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ यात सुधारणा करून तशी तरतूद केली आहे. मात्र, यातही अडचणी येतच होत्या. त्यातच आता जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या मंडणगड, लांजा, देवरूख, गुहागर या नगरपंचायतींच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांना आता आपल्या मालकीहक्कापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शासनाच्या या कायद्याने ग्रामीण भागातील कुळांनाच कूळहक्क शाबूत करता येते. नगरपरिषद अथवा नगरपंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांसाठी तशी कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे यावर्षी निर्माण झालेल्या या चार नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कुळांना आता नव्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
गुहागरमधील असगोली, लांजा शहर, गुहागर शहर आणि देवरूख शहर पूर्वी ग्रामीण भागात येत असल्याने येथील कुळांनी वहिवाट शाबूत करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत. मात्र, आता या चारही शहरात नगरपंचायत झाल्याने ही शहरे ग्रामीण क्षेत्रात न येता नगरपंचायतीत समाविष्ट झाली आहेत. शहरातील कूळवहिवाटदारांच्या मालकीची जमीनही आता नगरपंचायतीच्या क्षेत्रात येत असल्याने नगरपंचायतीच्या आकृतीबंधानुसार त्यावर कुळांना हक्क सांगता येणार नाही. त्यामुळे आता ही कुळे अडचणीत आली आहेत.असगोली हे गाव गुहागर नगरपंचायतीमध्ये समाविष्ट झाले आहे. याबाबत असगोलीतील कुळांनी कोकण आयुक्त राधेश्याम मोपलवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण दौऱ्यावर आलेल्या समितीसमोर आपली व्यथा मांडली. ही उद्भवलेली नवीन समस्या शासनासमोर मांडून लवकरच त्याबाबत योग्य निर्णय देऊ, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे. मात्र, याबाबत सुधारणा होईस्तोवर कुळांना आपल्या जमिनीच्या हक्कासाठी झगडावे लागणार आहे. नगरपंचायत क्षेत्रातील कुळांना याबाबतचा न्याय कधी मिळणार, असा सवाल विचारला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The question of the members of the Nagar Panchayat area was like '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.