मळगावमधील ‘त्या’ रस्त्याचा प्रश्न सुटेना
By admin | Published: April 11, 2017 12:27 AM2017-04-11T00:27:09+5:302017-04-11T00:27:09+5:30
सुतारवाडीतील ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत : महामार्गालाही संभाव्य धोका, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष
रामचंद्र कुडाळकर ल्ल तळवडे
राष्ट्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गेली सात वर्षे मळगाव सुतारवाडीतील रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच बॉक्सवेलचे काम अर्धवट आहे. यामुळे अगोदरच अडचणीत असलेली वाहतूक आता धोकादायक बनत आहे. राष्ट्रीय महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारित असून, वारंवार विनंती, सूचना व तक्रारी करूनही हे काम पूर्ण करण्यास विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ऐरणीवर आलेली ही समस्या सोडविण्यासाठी संतप्त ग्रामस्थ उपोषण करण्याच्या तयारीत आहेत.
मुंबई-गोवा झाराप-पत्रादेवी महामार्गालगत बायपास अंतर्गत मळगाव-सुतारवाडी रस्ता येतो. पूर्णपणे या रस्त्याची मालकी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अखत्यारित येते. या मार्गावरील सर्व बायपास रस्त्यांचे कामकाज पूर्ण झाले. फक्त हा एकमेव रस्ता अर्धवट स्थितीत संबंधित राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने ठेवला आहे. बाकीचे अपूर्ण रस्ते पूर्ण झाले असताना हाच रस्ता अपूर्ण ठेवून काय ईप्सित साध्य होत आहे, असा सवाल ग्रामस्थांसमोर उपस्थित केला जात आहे.
सध्या संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्यासाठी डागडुजी करण्यासाठी निधी नसल्याचे सांगून ग्रामस्थांना टाळत आहेत. सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांनी उपोषण केल्यानंतर हा प्रश्न समोर येणे म्हणजे दुर्दैवाची बाब आहे.
या जिल्ह्याचे खासदार, पालकमंत्री यांनीही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष केंद्रीत केलेले नाही. वारंवार येथील ग्रामस्थ गेली पाच वर्षे या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या कार्यालयात पत्रव्यवहार, पायपीट करतात. पण त्यांचा अजूनही प्रश्न सुटत नाही. मळगाव-सुतारवाडीतील ग्रामस्थांनी ज्यावेळी याच महामार्गाच्या मुंबई-गोवा बायपासवर उपोषण केले तेव्हा २०१७-१८ च्या आर्थिक वर्षात या रस्त्याचे डांबरीकरण करून देतो, असे सांगितले व हा रस्ता डागडुजी करून देऊ, असेही सांगितले.
पण जेव्हा संबंधित विभागाचे अधिकारी पुन्हा या ग्रामस्थांशी चर्चा करायला आले, तेव्हा दोन डंपर माती व एक डंपर दगड टाकून तात्पुरती डागडुजी करतो, असे सांगितले. पण ग्रामस्थांनी हे त्यांचे मत मान्य केले नाही. पावसाळी हंगामात हे काम पूर्णपणे वाहून जाणार. माती टाकून काही फायदा होणार नाही, असे सांगितले. जर आम्हाला चांगले काम करून द्यायचे असेल तरच करून द्या. तसेच या मार्गावरून पाणी वाहून जाण्यासाठी काँक्रिटचा गटार मारून द्या. पण निधी नसल्याचे कारण दाखवून ही मागणीही अद्यापपर्यंत त्यांच्याकडून पूर्ण करण्यात आलेली नाही.
त्याचप्रमाणे मळगाव-सुतारवाडीत साधी चारचाकी गाडी नेणेही धोक्याचे झाले आहे. जर हायवेच्या खालून दोन्ही बाजूंचे पाणी जाण्यासाठी पाईप टाकला, तर त्या पाण्याच्या मोरीवरच्या सिमेंटच्या फरशा तुटून गेल्या आहेत. वाहतूकही बंद झाली आहे.
महामार्गाचा संरक्षक कठडा तुटून गेला आहे. महामार्गाची उंची वाढविण्यासाठी जो भराव टाकला, त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वारंवार याठिकाणी अपघात होतात. शिवाय मळगाव-सुतारवाडी मार्गावरील असणाऱ्या मोरीचेही काम रेेंगाळले आहे. वारवांर मागणी करूनही त्याकडेही कानाडोळा करण्यात आला आहे.
तर महामार्गावरून खाली पडणाऱ्या पाण्यामुळे येथील रस्ता वाहून गेला आहे. शिवाय या मार्गावरून नित्यनियमाने होणारी वाहतूकही मोठी असल्याने सध्या या रस्त्याची चाळण झाली आहे. परिणामी ग्रामस्थ, वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
मागील वर्षी या रस्त्यासाठी मळगाव-सुतारवाडीतील ७० ते ८० ग्रामस्थांनी उपोषण केले होते. त्यावेळी निधी नसल्याने तत्काळ डागडुजी करून दिला जाईल, असे अधिकाऱ्यांनी पत्र दिले. पण केवळ मनाच्या समाधानासाठी केलेल्या रस्त्याने ग्रामस्थांच्या उपोषणाला संबंधित खात्याने बेदखल केले.
गेली पाच वर्षे या सुतारवाडीतील ग्रामस्थ या रस्त्यासाठी विनंती, सूचना, निवेदने, पत्रव्यवहार यातून अखंडीत प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या मागणीला सर्वच अधिकारी व लोकप्रतिनिधी केराची टोपली दाखवत आले आहेत. केवळ तेवढ्यापुरते आश्वासन दिले जाते, नंतर मात्र त्याची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ मेटाकुटीस आलेले आहेत. ग्रामस्थ या रस्त्याच्या प्रतिक्षेत आहेत.