आंबोली घाटातील स्टॉल्सचा प्रश्न निकाली, शिवसेना-भाजपचे पदाधिकारी आले धावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 04:38 PM2019-06-17T16:38:31+5:302019-06-17T16:39:43+5:30
वनविभागाने अंधाराचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी आंबोली घाटातील स्टॉल्स तोडून टाकत आतील सामान घाटात फेकून दिले होते. या विरोधात भाजप- शिवसेनेच्यावतीने उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना जाब विचारताच स्टॉल पुन्हा एकदा लागले आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यानी स्टॉलधारकांना एकत्र केले, तर राजन तेलींच्या माध्यमातून वनमंत्र्यांनी हा प्रश्न निकाली काढला आहे.
सावंतवाडी : वनविभागाने अंधाराचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी आंबोली घाटातील स्टॉल्स तोडून टाकत आतील सामान घाटात फेकून दिले होते. या विरोधात भाजप- शिवसेनेच्यावतीने उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना जाब विचारताच स्टॉल पुन्हा एकदा लागले आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यानी स्टॉलधारकांना एकत्र केले, तर राजन तेलींच्या माध्यमातून वनमंत्र्यांनी हा प्रश्न निकाली काढला आहे.
आंबोली घाटात गेली अनेक वर्षे आंबोली, चौकुळ ग्रामस्थ स्टॉल लावतात. यातून येणाऱ्या पर्यटकांना जागेवरच खाद्य मिळते. त्यामुळे स्टॉलधारकांना रोजगारही मिळतो. तसेच पर्यटकांची पायपीटही थांबते. पण गेली दोन वर्षे वनविभागाचे अधिकारी या स्टॉलवर हातोडा फिरवित आहेत.
ऐन पावसाच्या तोंडावर या स्टॉलधारकांचा व्यवसाय होत असतो. त्याचवेळी वन विभागाला जाग येत असते. गेल्या वर्षीही असाच प्रकार झाला होता. त्यावेळीही वनविभागाला जाब विचारताच त्यांनी स्टॉलधारकांपुढे नमते घेत पुन्हा स्टॉल उभारणीस परवानगी दिली होती.
मात्र, दोन दिवसांपूर्वी वन विभागाचे काही अधिकारी अंधाराचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास स्टॉलवर गेले आणि सर्व स्टॉल्स कटरने तोडून टाकले. यात किमती ताडपत्री तसेच हॉटेलमधील सामान होते. हे सर्व सामान दरीत फेकून दिले. तसेच पुन्हा स्टॉल लावल्यास पुन्हा तोडून टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे स्टॉलधारक दोन दिवस शांत होते. मात्र, दोन दिवसांनंतर भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग हे आंबोलीत गेले. त्यांनी यातील काही स्टॉलधारकांना धीर दिला आणि त्यांना सावंतवाडीत आणत उपवनसंरक्षकांची भेट घालून दिली.
त्याचवेळी तेथे भाजपचे माजी आमदार राजन तेली, शिवसेनेचे रुपेश राऊळ, राघोजी सावंत, शब्बीर मणियारही दाखल झाले. या सर्वांनी उपवनसंरक्षक चव्हाण यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही चव्हाण यांना स्टॉलधारकांचा प्रश्न सोडवा, असे आदेश दिल्यावर लागलीच प्रश्न मार्गी लागला. त्यानंतर स्टॉलधारक आंबोली येथे गेले. त्यांनी आपले स्टॉल पूर्ववत लावले आहेत. आता या स्टॉलधारकांची यादी उपवनसंरक्षकांनी बनवली असून, त्याप्रमाणेच हे स्टॉल लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, सारंग यांनी या स्टॉलधारकांना एकत्र केले नसते तर यावर तोडगाच निघू शकला नसता, असे स्टॉलधारकांनी सांगितले.