आरोसबाग पुलाचा प्रश्न निकाली
By Admin | Published: June 17, 2016 11:12 PM2016-06-17T23:12:49+5:302016-06-17T23:24:33+5:30
शीतल राऊळ, मंदार कल्याणकर यांची माहिती : १६ कोटीचा निधी मंजूर, वर्षाअखेरीस कामास सुरूवात
बांदा : भाजपाच्या माध्यमातून बांदा शहरात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. गेली कित्येक वर्षे रखडलेल्या आरोसबाग येथील पूलाचा आराखडा तयार करण्यात आला असून या पूलासाठी १६ कोटि रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पूलाची भूगर्भ चाचणी पूर्ण झाली असून या वर्षाच्या अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूलाच्या कामाची पायाभरणी होणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शितल राऊळ व बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बांदा शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आरोसबाग पुलासाठी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कामाच्या निविदा मागविण्यात येणार आहेत. त्यानंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. पुलासाठी १३ कोटी रुपये तर दोन्ही जोडरस्त्यांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
शहरातील मिठगुडी, लकरकोट परिसरात तेरेखोल नदिपात्रालगतचा बराचसा भाग कोसळल्याने याठिकाणी धुपप्रतिबंधक बंधारा बांधावा असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता. येथे ३00 मीटर संरक्षक भिंत बांधण्यासाठी दिड कोटी रुपयांचा निधी मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून मंजूूर करण्यात आला आहे. बांदा-वाफोली मार्गावरील निमजगा येथील पाटो पुलासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून ९0 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. निमजगा-गवळीटेंब वाडीसाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून ५0 लाख निधी मिळाला असूून या नळयोजनेचे काम सुरु करण्यात आले आहे.
यामुळे या परिसरातील पाणीटंचाई दुर होणार असून भविष्यात बांदा शहरात दररोज पाणी पुरवठा करण्याचा आमचा संकल्प आहे. तुळसाण पुल येथे पक्का बंधारा बांधण्यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आले आहे. याचा फायदा या नदिपात्रातील १२ गावांच्या नळपाणीयोजनेला होणार आहे. बांदा शहरात १00 एलईडी पथदिप बसविण्यात येणार आहेत.
शहरातील निजमगा येथे तालुुका क्रिडा संकुलाला मंजुरी मिळाली असून क्रिडामंत्री विनोद तावडे यांनी यासाठी ५ कोटि रुपयांचा निधी मंजुर केला आहे. वाढिव तिन कोटि रुपये निधी विशेष बाब म्हणून देण्यात आले आहेत.
या संकुलाचे आॅक्टोबर महिन्यात भुमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच १४ व्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदांना थेट जमा करण्याचा निर्णय घेतल्याने याअंतर्गत बांदा ग्रामपंचायतीला यावर्षी १६ लाख रुपयांचा निधी मिळाला
आहे. (प्रतिनिधी)
वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण होणार
राज्यात शिवसेना-भाजपाच्या युतीचे सरकार असताना १९९७-९८ साली तत्कालिन बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते या पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले होते.
त्यानंतर आघाडी शासनाच्या कालावधीत पंधरा वर्षे या पुलाचे काम पूर्णत: रखडले होते.
आता पुन्हा युती शासन सत्तेत आल्यानंतर पुन्हा या कामासाठी १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलाचे काम झाल्यास आरोसबाग येथील १000 लोकवस्तीचा रहदारीचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.