सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कोटपाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:28 AM2020-01-25T11:28:27+5:302020-01-25T11:32:07+5:30
सिंधुदुर्ग : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि शाळा- कॉलेजजवळ तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्या वेंगुर्ला, सावंतवाडी आणि मालवण येथील विक्रेत्यांवर सिंधुदुर्ग ...
सिंधुदुर्ग : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि शाळा- कॉलेजजवळ तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्या वेंगुर्ला, सावंतवाडी आणि मालवण येथील विक्रेत्यांवर सिंधुदुर्ग पोलिसांनी कारवाई करण्यात आली.
धूम्रपान आणि तंबाखू- मावा सेवनाच्या व्यसनामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यात मुले आणि महाविद्यालयीन युवक बळी ठरत आहेत. त्यांचे दुष्पपरिणाम लक्षात घेता सिंधुदुर्ग पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांच्या नेतृवाखाली तंबाखू विरोधी कोटपाची विशेष कारवाई मोहीम हाती घेतली आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा ( कोटपा ) अंतर्गत कडक कारवाई करण्यात येते. त्यांचे खास प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम तसेच अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध हेल्थ फाऊंडेशन तर्फे कोटपा कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फाऊंडेशनच्या माध्यमातुन कृती कार्यक्रमही आखला आहे.
वेंगुर्ला आणि सावंतवाडी येथील पान टपऱ्यांवर कारवाई
वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांचा नेतृत्वाखाली वेंगुर्ला पोलिसांनी कोटपा कायद्यानुसार शुक्रवारी शाळा महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या पान टपऱ्या दुकानांवर कारवाई केली.
कोटपा कायदा कलम ४ नुसार सार्वजनिक धूम्रपान करणारे आणि कोटपा कलम ६ (ब), (अ) नुसार वेंगुर्ला बाजार, मारुती नाका आणि शाळा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे तंबाखू सिगारेटची अवैध विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले असून स्थानिकांकडून पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले जात आहे. वेंगुर्लाप्रमाणे संध्याकाळी सावंतवाडी येथे ही कारवाई झाली.
केवळ तंबाखू वापरामुळे ५० टक्के कॅन्सर
एकूण कॅन्सर रुग्णांपैकी सर्वात जास्त म्हणजे ५० टक्के कॅन्सर हे केवळ तंबाखू वापरामुळे होतात. केवळ ३० टक्केच लोक रुग्णालयात उपचार घेतात. समाजात तंबाखू सेवनावर प्रतिबंध आल्याशिवाय मरणाऱ्यांचे प्रमाण कमी होणार नाही. कोटपा कायद्याची प्रभावी अमंलबजावणी केल्यास तंबाखूमुळे होणारे कॅन्सरचे प्रमाण कमी करता येईल असे केअरिंग फ्रेंड्सचे निमेश सुमती सांगतात.
कोटपा-२००३ कायदा म्हणजे काय ?
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम २००३ हा केंद्र सरकरचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी कलम-४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. तर कलम- ६ (ब ) नुसार कोणत्याही शैक्षणिक संन्स्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. तसेच बाल न्याय कायदा कलम-७७ नुसार बालकांना किव्हा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्यास १ लाख रुपये आणि ७ वर्षाची शिक्षची तरतूद करण्यात आली आहे. बाल न्याय कायदा कलम ७७ नुसार कारवाई करणारे महाराष्ट्र हे पाहिले राज्य आहे.