घोणसरीत दारुच्या हातभट्टीवर छापा; १ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 01:21 PM2020-10-19T13:21:35+5:302020-10-19T13:25:59+5:30
kankavli, liqerban, sindhudurgnews कणकवली तालुक्यातील घोणसरी गावातील नदीपात्रालगत जंगलमय भागात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारू विक्रीसह दारुच्या हातभट्टीवर छापा टाकत १ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास केली.
कणकवली : कणकवली तालुक्यातील घोणसरी गावातील नदीपात्रालगत जंगलमय भागात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारू विक्रीसह दारुच्या हातभट्टीवर छापा टाकत १ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन शेळके, उपनिरीक्षक शाहू देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने धडक कारवाई करीत दोन हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत.
घोणसरी येथील व्हिक्टर बस्त्याव बारेत (६२, रा. घोणसरी टेंबवाडी) हा घोणसरी येथील सिरसाचे आळे येथील जंगलमय भागात गावठी बनावटीच्या दारुची निर्मिती करताना आढळून आला. या कारवाईत मुद्देमालासह संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत ज्ञानेश्वर कांदळगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच घोणसरी येथील काझीचे बुरुड जवळील जंगलमय भागात जॉन मोतेस पिंटो (५१, रा. घोणसरी टेंबवाडी) हा शनिवारी सकाळी ८.२० वाजण्याच्या सुमारास गावठी बनावटीच्या दारुची निर्मिती करताना आढळून आला. यावेळी मुद्देमालासह संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
कारवाई सुरू असताना जोस्पिन व्हिक्टर बारेत (५५, रा.टेंबवाडी) ही घराजवळील परिसरात गावठी बनावटीची दारू विक्री करीत आहे अशी माहिती समजताच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने छापा टाकून अवैधरित्या विक्री करीत असलेली दारू जप्त केली आहे. या प्रकरणी प्रतीक्षा कोरगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कणकवली शहरातही गोवा बनावटीची दारू जप्त
कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात अवैधरित्या ७६ हजार ८० रुपयांची गोवा बनावटीची दारू वाहतूक करीत असताना जप्त केली आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास केली. पटवर्धन चौकात कारमधून (क्रमांक एम. एच. ०२, बी. जी. ९९४७) गोवा बनावटीची दारू वाहतूक करीत असल्याच्या संशय आल्यामुळे ऑन ड्युटी वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल संदेश आबिटकर यांनी कारचा पाठलाग करीत संशयित आरोपी वामन आत्माराम दळवी (रा. कुडाळ ) व प्रशांत अशोक सावंत (रा. पणदूर, मयेकरवाडी) या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील ७६ हजार ८० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.