कुडाळात वैनगंगा बँकेवर दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:11 PM2018-07-15T23:11:50+5:302018-07-15T23:11:58+5:30

Raid on Wainganga bank in Kudal | कुडाळात वैनगंगा बँकेवर दरोडा

कुडाळात वैनगंगा बँकेवर दरोडा

Next


कुडाळ : तालुक्यातील पावशी येथील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कोकण विदर्भ ग्रामीण (वैनगंगा) बँकेवर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून दहा लाखांच्या दागिन्यांसह सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान घडली.
बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे व सायरन यापैकी कोणतीही यंत्रणा नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. प्रभारी पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
पावशी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील महामार्गालगत कोकण विदर्भ बँक गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. शनिवार व रविवारी सुटीनिमित्त बँक बंद होती. बँकेच्या शेजारी धुरी कुटुंबीयांचे घर आहे. रविवारी सकाळी ८ वाजता धुरी हे त्यांच्या न्हाणीघराचा पडलेला पत्रा उचलण्यासाठी गेले असताना त्यांचे लक्ष बँकेच्या खिडकीकडे गेले. त्यांनी निरखून पाहिले असता खिडकीचे काही गज वाकलेले, तर काही कापलेल्या स्थितीत असल्याने त्यांना संशय आला.
धुरी यांनी त्वरित याबाबतची माहिती बँक असलेल्या इमारतीचे मालक वाटवे यांना दिली. वाटवे यांनी तेथे येऊन खातरजमा केल्यानंतर बँकेच्या कॅशिअरला याबाबत कल्पना दिली. काही वेळात तेथे आलेल्या कॅशिअर व बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कुडाळ पोलिसांना माहिती दिली. कुडाळचे पोलीस निरीक्षक जगदीश काकडे यांनी इतर अधिकारी व पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी बँकेचा दरवाजा उघडला असता गज कापलेल्या खिडकीच्या आतील बाजूने उतरण्यासाठी चोरट्यांनी खुर्च्यांचा वापर केल्याचे निदर्शनास आले. स्ट्राँग रूमचा दरवाजा गॅस कटरने कापून आतमध्ये प्रवेश केल्याचे दिसून आले. तिजोरीमध्ये शुक्रवारी ठेवण्यात आलेली सुमारे पाच लाखांची रक्कम व ग्राहकांनी कर्जापोटी गहाण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची चोवीस पाकिटे दरोडेखोरांनी चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दरोड्यासाठी वापरलेला गॅस कटर, आॅक्सिजन गॅस सिलिंडर, कटावणी आणि इतर काही साहित्य बँकेच्या परिसरात टाकले होते. चोरट्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते.
दरम्यान, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम सध्या सुटीवर असल्याने प्रभारी म्हणून रत्नागिरीचे उपजिल्हा पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्याकडे जिल्ह्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. घट्टे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रत्नागिरी येथील श्वानपथकही दाखल झाले असून, पथकातील श्वान ‘रेम्बो’ याने घटनास्थळावरून मुंबईच्या दिशेने चाळीस ते पन्नास मीटर अंतरापर्यंत धाव घेतली. याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.
ते चार युवक कोण?
शनिवारी रात्री ११ वाजता बँकेपासून काही अंतरावर उभी असलेली पांढºया रंगाची कार स्थानिकांनी पाहिली होती. कारमधील युवकांनी आपण बुलडाण्याहून गोव्याला फिरण्यासाठी आलो असून, येथे थोडा वेळ झोपणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. मात्र, ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांना तेथे थांबायला दिले नाही. त्यामुळे ते युवक कोण होते, याचीही चर्चा परिसरात होती.

Web Title: Raid on Wainganga bank in Kudal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.